शिर्डी नाशिक मिरर वेबटीम : शिर्डी संस्थानने भक्तांच्या पेहरावासंदर्भात लावलेला वादग्रस्त बोर्ड तातडीने हटवावा, अन्यथा १० डिसेंबर रोजी लोकशाही मार्गाने आम्ही शिर्डीमध्ये येऊन हा बोर्ड काढू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानला दिल्यानंतर प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. प्रशासनाने तृप्ती देसाई यांना शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये आज रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी (११ डिसेंबर) रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. तसा आदेशही शिर्डीचे प्रातांधिकारी गोविंद शिंदे यांनी काढला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाची प्रत महसूल व पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी देसाई यांना त्यांच्या घरी जाऊन दिली आहे. त्यामुळे आता देसाई यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून मोठा वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही तिथे येऊन काढू, असा थेट इशाराच दिला होता. मात्र त्यानंतरही हा बोर्ड हटवला गेला नसल्याने आम्ही १० डिसेंबर रोजी हा बोर्ड काढण्यासाठी येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले होते. त्यानंतर तातडीने साई संस्थान व भूमाता ब्रिगेडच्या वादात प्रशासनाने उडी घेत देसाई यांना शिर्डीत येण्यास बंदी घातली आहे.

संस्थानला 15 हजार भाविकांचा पाठिंबा

फलकावरून वाद निर्माण झाल्यावर साईसंस्थानने भाविकांची मते अजमावली. गेल्या चार दिवसांत दर्शनासाठी आलेल्या तब्बल पंधरा हजार भाविकांनी, दर्शनबारीतील अभिप्राय वहीत साईसंस्थानच्या बाजूने कौल दिला, तर 93 भाविकांनी देसाई यांच्या भूमिकेस पाठिंबा दिला. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी आज ही माहिती जाहीर केली.

बातम्या

Don`t copy text!