शेकडो वर्षाच्या परंपरेला प्रथमच खीळ

नाशिक मिरर वेबटीम : नंदुरबार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सारंगखेडा यात्रेला जिल्हाप्रशासनाने परवानगी नाकारली आहे. परिणामी कोट्यावधी रुपयांची उलढाल घडवणारा महाराष्ट्रातील नंदुरबार मधील सारंगखेडा प्रसिद्ध घोडेबाजार सुद्धा यंदा भरणार नाही. सारंखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दत्त जयंती पासून तापी काठावर भरणाऱ्या या यात्रेतील घोडेबाजार खास आकर्षण असते. विविध राज्यातील घोडे विक्रेते हजारो घोडे घेऊन येथे येत असतात. शेकडो वर्षाच्या परंपरेला कोरोनामुळे प्रथमच खंड पडला आहे. पंचवीस लाख, पन्नास लाख पासून कोटी रुपये किमतीला एकेक घोडा विकला गेल्याचे विक्रम येथे नोंदवले गेले आहेत. ही यात्रा आणि हा बाजार पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक हजेरी लावत असतात. यंदा मात्र प्रथमच दत्त जयंतीला सारंगखेडाचे तापी पात्र रिकामे राहणार आहे. दरम्यान, दत्त जयंतीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करून आवश्यक व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. सारंगखेडा यात्रेबाब जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.डॉ.भारुड म्हणाले, पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मर्यादीत राहील आणि शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. मंदिरात पारंपरिक विधी आणि भाविकांचे दर्शन सुरू राहील. मंदिर परिसरात केवळ 50 व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा. इतर भाविकांना टप्प्याटप्प्याने तेथे आणण्याची व्यवस्था करावी. भाविकांनां योग्य रांगेत उभे रहाण्यासाठी खूणा करण्यात याव्यात.

रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. दत्त जयंतीच्या दिवशी गरजेनुसार स्थानिक प्रशासनाने एक किंवा दोन तास वेळेत वाढ करावी. आरोग्य विभागाने मंदिर परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करावे आणि थर्मल स्कॅनरची व्यवस्था करावी. ग्रामपंचायतीने दोन ठिकाणी साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी. फुले आणि नारळाच्या दुकानांची संख्या मर्यादीत ठेवावी व अशा दुकानांची माहिती पोलीसांना द्यावी. निवडणूक आचारसंहितेचे सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.श्री.पंडीत म्हणाले, भाविकांची गर्दी वाढल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था करावी. मंदिर परिसरात त्यांना ठरावीक अंतराने सोडावे. परिसरात नियंत्रण कक्ष स्थापित करून त्यात सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे. मास्कशिवाय भाविकांना मंदिरात प्रवेश देऊ नये, असे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी आणि मंदिर समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!