ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मनसे ची मागणी
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर भागात दि.१७रोजी दुर्देवी घटना घडली, मनपा घंटागाडीचा हलगर्जीपणामुळे पायी चालत असलेल्या रोशनी जयस्वाल या युवतीला आपले प्राण गमवावे लागले.तिचे पोलीस होण्याचे स्वप्न देखील अपूर्ण राहिले. रोशनी ही घरातील मोठी मुलगी असल्याने घरातील आई-वडील व तीन बहिणी ना तिचाच आधार होतो.त्यामुळे कुटुंबाचा आधार गेल्याने नाशिक महानगरपालिका व ठेकेदार यांनी तत्काळ रोशनी च्या कुटुंबाला आर्थिक मदत करून ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनपा गटनेते तथा प्रभाग ११ चे नगरसेवक सलीम शेख, मा.प्रभाग सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,घंटागाडी मुळे सातपूर परिसरात अनेक वेळा यापूर्वी अपघात झाले आहेत . याबाबत वारंवार नागरिकांनी आवाज उठवूनही मनपा प्रशासन मात्र ठेकेदाराना पाठीशी घालत आहे. काल घडलेल्या अपघातामुळे एका तरुण मुलीला उमेदीच्या काळात आपले प्राण गमवावे लागले, असून तिच्या स्वप्नांचा देखील चुराडा झालेला आहे .त्याचबरोबर त्या मुलीच्या कुटुंबांनाही आपल्या होतकरू जबाबदार व कमावत्या मुलीला गमावण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कुटुंबीयांवर मानसिक व आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धक्का बसला आहे. दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेऊन कुटुंबीयांना महानगरपालिका मार्फत आर्थिक मदत देण्यात यावी व कुटुंबाला विपरीत परिस्थितीत आर्थिक आधार देण्याचे काम करावे अशी विनंती मनसे गटनेते सलीम शेख नगरसेवक योगेश शेवरे, यांनी केली आहे.यावेळी दिपक हिंगमीरे, विनोद जाधव, राहुल शहाणे, शैलेश बस्ते,क्लिटन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
