नाशिक मिरर : मालेगाव
सेल्फी काढण्याच्या नादात बोरी धरणात पडून सख्या भावांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील विराणे शिवारात घडली. बुधवारी (दि.24) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजंग येथील रहिवासी व येवल्याच्या जनता विद्यालयाचे उपशिक्षक देविदास दत्तू जाधव यांचा मोठा मुलगा हर्षल (22) व लहान मुलगा रितेश (18) हे दोघे निमशेवडी गावात मित्राच्या लग्नाला गेले होते. माघारी येताना विराणे परिसरात धरणाचा जलसाठा दिसल्याने त्यांना छायाचित्र घेण्याचा मोह झाला. काठावर उभे राहून सेल्फी घेत असताना जोराचा वारा आला. या गडबडीतच शेवाळलेल्या दगडावरुन पाय घसरुन एकाचा अचानक तोल जावून तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याचा दुसर्या भावाने प्रयत्न केला. परंतू ते खोल पाण्यात खेचले गेले. पोहता येत नसल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. दोघांचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढले. याबाबत गिलाणेचे सरपंच नंदकुमार सोनवणे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांना खबर दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे व सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यविधी झाले. जाधव यांना केवळ दोन मुल होते. त्यांच्या मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, 1 नोव्हेंबर 2020 रोजी मुंगसे येथील दोन मित्रांचा टाकळी शिवारातील तलावात याचप्रमाणे सेल्फी घेण्याच्या नादात बुडून मृत्यू झाला होता. गतवर्षी मुसळधार पर्जन्यमान राहिल्याने तलाव, बंधारे व धरण तुडूंब भरले होते. उन्हाळ्यातही त्यात बर्यापैकी जलसाठा असल्याने त्याठिकाणी छायाचित्र घेण्याच्या नादात अपघात होत आहेत.
