नाशिक मिरर :
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील सूचनापत्र ब्रेक द चैन नुसार राज्यातील कोरोना स्थिती विचारात घेऊन विविध निर्बंध लागू करण्यात येत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांची जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पालकमंत्री छगन भुजबळ यांची झालेल्या बैठकीत दि. १० एप्रिल रोजीची बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार सद्यस्थिती मध्ये जिल्हयातील वाढते रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता कोविड-१९ वाढती रुग्ण संख्येची साखळी तोडण्याकरीता प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीची स्थिती पाहता काही निर्बंध अधिक कठोर करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची खात्री झाली असून कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी तसेच प्राधिकरणाचे सदस्य पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांनी नाशिक जिल्ह्यात याबाबत आदेश काढले आहेत.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण नाशिक जिल्हयाकरीता दि. १२ मे २०२१ रोजी दुपारी १२ वाजे पासून ते दि. २३ मे २०२१ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन शी घोषणा केली आहे.यामध्ये काय सुरू राहणार आहेत. व काय बंद याबाबत ची सविस्तर नियमावली पुढील प्रमाणे
1. कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास संपुर्णत: बंदी राहील.
२.सर्व किराणा मालदुकाने, बेकरी, मिठाई व तत्सम दुकाने तसेच पाळीव प्राण्याच्या जीवनावश्यक बाबींची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 याकालावधीत केवळ घरपोच सेवा देण्यासाठी सुरू राहतील. ग्राहक या आस्थापनांमध्ये येणार नसून ग्राहकांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे दुकानदार माल घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था करतील. या बाबतचे नियोजन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था करतील.
3. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था यांना संकलन व घरपोच विक्रीसाठी सकाळी 07.00 ते 12.00 वा. आणि केवळ संकलनासाठी सायंकाळी 05.00 ते 07.00 वा. परवानगी राहील.
4. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मद्यविक्री केंद्रे यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 व सायंकाळी 5.00 ते 07.00 वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास या आस्थापनांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळुन आल्यास संबंधीत आस्थापनेवर कायदेशिर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था/स्थानिक पोलीस अधिकारी यांची राहील.
5. शिव भोजन थाळी केंद्र सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहील व तेथून केवळ पार्सलद्वारे अन्नपदार्थ वितरित होतील. तेथे बसून भोजन करणे प्रतिबंधित राहील. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.
6.शासकीय रास्त भाव दुकाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे सुरू राहतील.
7.उक्त कालावधीत जिल्हयातील सर्व कृषी उत्पनबाजार समित्या बंद राहतील.
8.शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील. या बाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील. उक्त कालावधीत जिल्हयातील सर्व भाजी मार्केट आणि आठवडी बाजार बंद राहतील. भाजी मार्केट पूर्णतः बंद ठेवून रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर आखणी करून देऊन सकाळी 07.00 ते 12.00 या वेळात भाजी, फळे विक्री करण्यासाठी जागा निश्चित करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. फिरत्या हातगाडी वरून वरील वेळेतच भाजीपाला व फळे विक्री करणेस परवानगी राहील.
9. औषध निर्मिती व ऑक्सिजन निर्मिती वगळता अन्य सर्व उद्योग केवळ इन सिटू पद्धतीने सुरू राहतील. म्हणजेच आस्थापना मालकांनी व व्यवस्थापक यांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा व या मनुष्यबळाची निवास व भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी कारखान्याच्या परिसरात अथवा नजीकच्या ठिकाणी करावी. या सर्व मनुष्यबळाचे दर दहा दिवसानंतर रॅपिड एंटीजन टेस्ट करणे देखिल अनिवार्य राहील. वरील सूचनांचे पालन करू न शकणारे सर्व उद्योग बंद राहतील. याबाबत सर्व नियंत्रण करण्याची जबाबदारी प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक व स्थानिक पोलीस स्टेशनची राहील.
नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आजच्या सकाळच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दिनांक
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
12 मे 2021 च्या दुपारी बारा वाजेपासून 23 मे च्या रात्री 12 वाजेपर्यंत
जे औद्योगिक आस्थापने कामगारांची राहण्याची व्यवस्था करू शकत नाहीत असे सर्व औद्योगिक आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी तसेच मा.महापालिका आयुक्त यांनी दिलेले आहेत
⭕जे उद्योग आपल्या कामगारांची राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था आपल्या कंपनीच्या आवारात करू शकत असतील त्यांनी कारखाने चालू ठेवण्यास हरकत नाही.
⭕ज्या उद्योगांना आपले उद्योग सुरू ठेवायचे असतील त्यांनी उद्या पर्यंत मंडप किंवा तात्पुरती राहण्याची व्यवस्था आपल्या कारखान्यात करून कामगारांना कंपनीच्या आत ठेवल्यास उद्योग चालू ठेवण्यास हरकत नाही.
⭕औषध निर्मिती व आरोग्यविषयक कारखाने सुरू राहतील.
⭕ कोणत्याही व्यक्तीला कंपनीच्या बाहेर जाता येणार नाही व बाहेरील व्यक्तीस आत येता येणार नाही.
वरील बाबींचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश
मा. जिल्हाधिकारी,
मा. महानगरपालिका आयुक्त यांनी दिले आहेत
मा. प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी यांनी या आदेशाला दुजोरा दिला आहे.
10. औद्योगिक व इतर वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतर जिल्हा, आंतरराज्य वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहिल. कच्च्या व पक्क्या मालाची वाहतुक निरंतर करता येईल. नाशिक जिल्हयातुन इतर जिल्हयात जाणान्या माल वाहतुक वाहनांना प्रवेश राहिल, मात्र त्यांना जिल्हयात कोठेही थांबता येणार नाही.
11. सर्व प्रकारची बांधकामे केवळ इन सिटू पद्धतीने सुरू राहतील. या आस्थापना चालकांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा व या मनुष्यबळाची निवास व भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी अथवा नजीकच्या ठिकाणी करावी. या सर्व मनुष्यबळाचे दर दहा दिवसानंतर रॅपिड एंटीजन टेस्ट करणे देखिल अनिवार्य राहील. याबाबत सनियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील.
12. कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबधीत दुकाने सकाळी 07.00 ते सकाळी 12.00 या वेळेत सुरु राहतील. या बाबी देखील गाव स्तरावर विकेंद्रित पद्धतीने वितरित करण्याचे नियोजनाची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक यांची राहील.
13. सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळया जागा, उद्याने, बगिचे पुर्णत: बंद राहतील.
14. शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद राहतील. तथापि ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही. नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमीक ) जि.प. नाशिक यांची राहील.
15. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ हॉल, मंगल कार्यालये, लॉन व तत्सम ठिकाणे हे पुर्णतः बंद राहतील, लग्न समारंभ करावयाचा असल्यास नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात करण्यात यावा. यावेळी पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबधीत विवाह नोंदणी कार्यालय प्रमुख यांची राहील. या निर्देशाचे उल्लंघन होवून लग्न समारंभ अन्यत्र आयोजीत झाल्यास आयोजक व उपस्थित सर्वाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 नुसार कारवाई संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी करतील.
16. अत्यंविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्ती व या नंतर च्या विधीसाठी जास्तीत जास्त 15 व्यक्तीं इतको उपस्थितीची मर्यादा राहील. या मर्यादेचे नागरिकांनी बिनचूकपणे पालन करावे व याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी उचित दक्षता घ्यावी.
17. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरणतलाव, करमणुक व्यवसाय नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृहे, सभागृहे संपुर्णतः बंद राहतील.
18. खाजगी व सार्वजनीक वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्सक सेवा, त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील.
19.मेडीकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास कालावधीत सुरु राहतील.
20.लसीकरण केंद्रे कोरोना विषयक सर्व प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करून सुरू राहतील. केंद्र सुरू करताना किती नागरिकांचे लसीकरण होणार आहे ती संख्या दर्शविणारा फलक दर्शनी ठिकाणी लावावा व लसीकरण केंद्राचे प्रमुख अनावश्यक गर्दी हटवून वेळोवेळी तितकेच लोक लसीकरण केंद्राजवळ रांगेत राहतील याची शहानिशा करावी. यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी यांनी केंद्र चालकांना सहकार्य करावे.
21.सर्व पेट्रोल पंपावर या आदेशान्वये नमुद करण्यात आलेल्या परवानगी दिलेल्या बाबींकरीताच पेट्रोल वितरित करण्यात यावेत. मालवाहतूक, रुग्णवाहीका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांचेकरीता पेट्रोल डिझेल याची उपलब्धता करुन देण्याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांची राहील.
22. गॅस एजन्सीज् मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात यावे. परंतु ग्राहकांनी गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळुन आल्यास संबधीत एजन्सी कारवाईस पात्र राहील. पर्यवेक्षणाची जबाबदारी संबंधित ऑईल कंपनी / जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.
23. सर्व बँका, पतसंस्था, पोष्ट ऑफिसेस ही कार्यालये नागरीकांसाठी केवळ अत्यावश्यक कामासाठी सकाळी 09.00 ते दुपारी 12.00 पर्यंत सुरु राहतील. तसेच ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्यात याव्यात.
24. शासकीय यंत्रणामार्फत मान्सुनपुर्व विकास कामे आवश्यक पाणी पुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहतील. संबधीत शासकीय यंत्रणांना याकरीता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागंतासाठी पुर्णतः बंद ठेवण्यात येत आहेत. अत्यावश्यक कामासाठी संबंधित कार्यालयाचे ईमेल अथवा दूरध्वनी सुविधेचा वापर करावा.
25. सेतू व आपले सरकार सेवा केंद्र अभ्यागतांसाठी बंद राहतील. पुर्णतः ऑनलाईन असलेल्या सेवा सुरू राहतील. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरु राहतील.
26 .स्थानिक दुकानदार, हॉटेल यांचेमार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकांच्या घरी जाताना बिल व संबधीत दुकानदारांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावे. संबधीत कर्मचा-यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
27. सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने, यांची वाहतुक नागरिकांना अत्यावश्यक कामाकरीता वापरण्यास परवानगी राहील.
28.अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
29.तसेच रुग्णांकरीता रिक्षा व खाजगी वाहनास परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभाग /पोलीस वाहतुक शाखेकडे राहील. जिल्हयाच्या माल वाहतुक व रुग्ण वाहतुक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही
30 . मालवाहतूक साठा, खतसाठा इ. बाबतीत फक्त लोडींग व अनलोडींग करण्यास परवानगी राहील. इतर कारणांकरीता व आवश्यक वैद्यकीय कारणांकरीता जिल्हयाबाहेर व आंतरजिल्हा वाहतूक करावयाची असल्यास https://covid19.mhpolice.in/
यावेबसाईटवरुन ई-पास काढून वाहतूक करता येईल.
31. उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या-त्या मुद्यांप्रमाणे नेमून दिलेल्या सक्षम अधिका-यांची राहील.
32. वरिल प्रमाणे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे लागु होतील तसेच कोणत्याही क्षेत्रास कामकाज सुरु ठेवण्याकरीता विशेष परवानगी दिनांक 23/05/2021 पर्यंत देण्यात येणार नाही.
33. वर स्पष्ट उल्लेख केलेल्या बाबी सोडुन इतर सर्व निर्बंध व नमुद शासन अधिसूचनेप्रमाणे तसेच यापुढे ही सुरु राहतील. तसेच ज्या आस्थापना सुरू राहण्यासाठी या आदेशाद्वारे परवानगी देण्यात आली आहे तिथे कोरोना विषयक सर्व प्रतिबंधात्मक बाबींची खबरदारी घेणे अनिवार्य राहील व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आस्थापना चालकांची
राहील. अन्यथा अशा आस्थापना बंद करून संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल व ती जबाबदारी संबंधित घटना व्यवस्थापकांची राहील.
वरील आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा, 1897 आणि भारतीय दंड संहिता 1860 तसेच यासंदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
