नाशिक मिरर :

मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल पण तोपर्यंत छञपती खा.संभाजीराजे भोसले यांनी सरकारकडे दिलेल्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय व्हावा तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारला दिलेल्या तिन्ही पर्यांयावर सकारात्मक पाऊल उचलावे असे आवाहन नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीने केले असून, राज्याभिषेक सोहळ्यासाठी जिल्ह्यातील हजारो समाज बांधव मिळेल त्या साधनाने रायगडावर कुच करणार असल्याचाही निर्धार या बैठकीत करण्यात आला.

राज्यव्यापी दौरा आणि विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीनंतर छञपती खा.संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत पञकार परिषद घेऊन आक्रमक पविञा जाहीर केला आहे. राज्याभिषेक दिनापुर्वी म्हणजे ६ जुनच्या आधी राज्य सरकारला दिलेल्या पाच मागण्यांबाबत मंञीमंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा कोव्हीड महामारीला न जुमानता तिव्र आंदोलनाची घोषणा रायगडावरून केली जाईल, असा इशारा खा.संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे.
यासंदर्भात आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने झुम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शंभरहून अधिक समाजबांधव सहभागी झालेल्या या बैठकीत नाशिक जिल्ह्याने सहा जुनच्या आंदोलानाचे रणशिंग फुंकले असून जिल्हाभरातून हाजारो समाज बांधव रायगडावर नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

६ जून२०२१ रोजी राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा आणि शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने जमा होणार आहेत.मराठा समाजाच्या बाबतीत शासनाला दिलेल्या अंतिम अल्टिमेटमवर सकारात्मक निर्णय सरकारने घेतला नाही तर आंदोलनाची पुढील रणनिती ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात येत्या दोन दिवसाच्या कालावधीत जनजागृती करून मराठा समाजाच्या घराघरात हा संदेश पोहचवून मिळेल त्या साधनाने रायगडावर जाण्याची तयारी केली जाणार आहे.

 

ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम अशा मिळेल त्या साधनांचा वापर करून मराठा समन्वयक मराठा समाजाची मानसिक तयारी करणार असून छञपतींचा आदेश अंतिम मानला जाणार असाल्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

राजकीय भूमिका स्पष्ट करून कोणत्याही पक्षाला न जुमानता स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करावा व आपण आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी तयार रहावे,असा सुरही बैठकीत व्यक्त झाला.

या वेळेस सहा जूनला कशा पद्धतीने जायचं यासाठी अंतिम रुपरेषा कोअर कमिटीच्या बैठकीत ठरवण्यात येईल शासन प्रशासन काय भूमिका घेते त्यावर पुढील निर्णय आपणा सर्वांना गुप्तपणे कळविण्यात येईल वेळ प्रसंगी पुन्हा एकदा गनिमी काव्याचा वापर करून रायगडावर पोहोचावे लागेल वेगवेगळ्या क्षेत्रातील उदाहरणार्थ डॉक्टर, वकील ,व्यवसायिक आधी आघाड्या निर्माण करून समन्वय साधणे कोर कमिटी ची स्थापना करून झालेले निर्णय जिल्ह्यामध्ये पोहोचवण्यासाठी तालुकानिहाय ग्रुप तयार करून सोशल मीडियाद्वारे संपर्कात लवकरच प्रत्यक्षात एक ते दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन मुख्य समन्वय समितीच्या बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात याव्या.अशी सुचना करण गायकर यांनी केली तर राजू देसले यांनी पोलीस व प्रशासन शंभर टक्के अडवणूक करणार आहे, त्यामुळे योग्य ती रणनीती आखूनच रायगडावर पोहचावे अशी सुचना केली.

राजकारण व समाजकारण एकत्रित करून लढा द्यावा रायगडावर जाण्यासाठी विशेष करून मालवाहतूक गाड्या यांचा वापर करावा अशी सूचना देखील करण्यात आली. ज्यांना शक्य असेल त्यांनी ईपास काढण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे कोविड ची टेस्ट करून ते रिपोर्ट देखील आपल्या सोबत ठेवणे गरजेचे आहे.नाशिक जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करावा. पत्रकार, साहित्यिक, कवी यांची स्वतंत्र मोट बांधावी व मराठा क्रांतीसाठी नाविन्यपूर्ण असे, लिखाण त्यांना करावयास सांगुन समाजप्रबोधनासाठी यांचे योगदान घेण्यात यावा. इतर वेगवेगळ्या समित्या करून त्या समित्यांकडून त्या पद्धतीचा पाठपुरावा कोर कमिटीने करून घ्यावा. नाशिक जिल्ह्याच्या पुढे ठाणे, रायगड आदी जिल्ह्यांमध्ये इतर समाज बांधव राहण्याची व जेवणाची सोय करणार आहे. ग्रामीण भागातून देखील अनेक प्रतिनिधींनी कोर कमिटीला आश्वासित केले आहे. मोठ्या प्रमाणात रायगडावरती जाण्याचा प्रयोजन आहे. परंतु सरकारने लाॕक डाऊन हेतुपुरस्कर वाढवलेला आहे असे गणेश कदम यांनी निदर्शनास आणले.प्रा.उमेश शिंदे यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले.या झूम बैठकीस करण गायकर,शिवाजी सहाणे, गणेश कदम, तुषार जगताप, राजू देसले, उमेश शिंदे ,संतोष माळोदे, निलेश मोरे ,योगेश कापसे, राम खुर्दळ, संजय फडोळ, संदीप शितोळे, विजय खर्जुल, आशिष हिरे, सुनील भोर, बंटी भागवत, योगेश पाटील, सुनिल गुंजाळ, यांच्यासह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.

६ जुन ,राज्याभिषेक सोहळा आणि मराठा समाजाचे संभाव्य आंदोलन याविषयी तपशीलवार नियोजन करून दिशा ठरविण्यासाठी बुधवार दि.२ जून रोजी वरद लक्ष्मी लाॕन्स औरंगाबाद रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी केवळ मुख्य समन्वयकांनी या बैठकीला आवर्जून हजर रहावे, असे आवाहन शिवाजी सहाणे व तुषार जगताप यांच्यासह आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.

बातम्या

Don`t copy text!