मिसाईल मॅन, भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात `वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा लेख…
वाचनाने देश शक्तिशाली
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी हाच वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. `अभ्यास एके अभ्यास’ न राहता समांतर वाचनही महत्वाचे आहे. डॉ. कलाम यांनी केवळ वाचन हा फक्त छंद करण्याऐवजी गरज म्हणून अधिक वाचन केले. देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वतःला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार डॉ. कलाम नेहमी करायचे व सांगायचे की, पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंद मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे. युवक वाचेल तर देश वाचेल अशी त्यांची खात्री होती.
दिसामाजी वाचीत जावे
समर्थ रामदास लिहितात `दिसामाजी काहीतरी वाचीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे, अखंड एकांत सोसावा, ग्रंथ मात्र धुंडाळावाʼ.
स्पर्धेच्या युगात ज्ञानार्जन ठेवणे व यशाचा वेग कायम ठेवण्यासाठी वाचन अपरिहार्य आहे.
जीवनातल्या असंख्य गरजा पूर्ण करायला, मित्र जोडायला, नोकरी मिळवायला, ध्येय गाठायला, स्मरणशक्ती वाढायला, मनाची शक्ती वाढायला, योग्य शिष्टाचार शिकण्यासाठी, वर्तमान काळातील घटना जाणण्यासाठी, मनःशांतीसाठी वाचनाचा साधन म्हणून उपयोग करू लागली आहेत.
80 टक्के ज्ञान पुस्तकातून
जगातील 80 टक्के ज्ञान एका माणसाला पुस्तकातून प्राप्त होते. दासबोधात म्हटले आहे, जो ग्रंथ वाचून मनात गर्व हरतो, त्यांच्या वाचन आणि मनाची भीती दूर होते. वाचनातून जीवन जगण्याची कुवत येते. भारत एक प्रगत राष्ट्र बनण्याचे स्वप्न बाळगून आहे. त्यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे. जीवनात विरंगुळा लागणारे व मनुष्याची खऱ्या अर्थाने जडणघडण करणारे परिणामकारक माध्यम म्हणजे वाचन होय.
स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश
सार्वजनिक ग्रंथालये म्हणजे केवळ वास्तू व पुस्तकाची अडशील कपाटे नव्हेत. ते एक सांस्कृतिक केंद्र असते. आज वाचन संस्कृती कमी झाली वगैरे म्हणणे ऐकू येते परंतू आज अनेक युवक ग्रंथालयांची संलग्न असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवीत आहेत. ग्रंथालयातील ग्रंथ, मासिके, दिवाळी अंक वाचता वाचता वाचनाची आवड निर्माण झाली. त्यातूनच त्यांना आपल्या जीवनाची दिशा मिळाली बघता-बघता आपले करिअर घडविले. योग्य मार्गाला लावले. स्पर्धा परीक्षा तसेच इतर क्षेत्रात यश मिळवून आपल्या समाजाचे घराचे नाव उज्ज्वल केले. अनेक लोक सांगतात की, आम्ही केवळ घडलो ते वाचन आणि वाचनालयामुळेच.
पुस्तकांची मागणी कायम
आजच्या युगात मनोरंजनाची माध्यमे उपलब्ध असताना पुस्तकांची मागणी तेवढी आणि तशीच आहे. आजच्या काळातला वाचक भ्रमात राहायला, काल्पनिक विश्वात रमायला ना करतो. तो प्रॅक्टिकल असल्यामुळे त्याला क्षणाक्षणाचा हिशोब हवा आहे. छोट्या कथा, थोरा-मोठ्यांची चरित्र-आत्मचरित्र, व्यक्तिमत्व विकासाच्या स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाचन करून आपले भविष्य उज्वल करत आहे. थोरामोठ्यांची चरित्रे वाचल्यानंतर कर्तव्य देशप्रेम साधेपणा पराक्रम इत्यादी गोष्टींचे संस्कार बालमनावर आपोआप होतात. वाचनाची सवय उत्तम वकृत्वकला पोषक ठरते.
मखमलाबाद सार्वजनिक वाचनालय
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञान, संगणक विषयांवरील पुस्तकांच्या वाचनाने मिळणाऱ्या ज्ञानाने यशस्वी जीवन जगण्याची स्वप्न पूर्ण होताना दिसते. ज्ञानाचे क्षेत्र खूप मोठे आहे. विस्तीर्ण आकाशात उंच भरारी घेताना जमिनीवरील उत्तुंग इमारती मुंग्यासारखे भासतात. इंग्लंड अमेरिकेतील भव्य मॉल्स कॉर्पोरेट कार्यालये, गुळगुळीत रस्ते यांचे आपल्याला अप्रूप असते. मात्र येथील ग्रंथालय किती सुसज्ज आहेत व तेथील वाचनाचे प्रमाण आपण लक्षात घेत नाही. भारताचे संविधान हे देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीत, सार्वजनिक ग्रंथालयांत, शैक्षणिक संस्थांत असले पाहिजे. जनतेला मिळालेले हक्क, अधिकार कोणते आहेत ? हे समजण्याची कोणती माध्यम लोकापर्यंत पोहोचत नाही. ज्ञानाची क्रांती ही मूठभरांसाठी नसून देशातील अज्ञान दारिद्र्य विषमता नष्ट करण्यासाठी आवश्यक आहे. सामान्यातील सामान्य माणसाला आवश्यक असलेली माहिती ही कोणत्याही ग्रंथालयातून मिळवून दिली जाते. कोणत्याही रोगावरील औषध शोधणारे शास्त्रज्ञ सांगतात की तो रोग कशामुळे होतो ?, हे समजले की त्या रोगावरील लस शोधून काढता येते.
लेखक – ग्रंथमित्र राजेश शिरसाठ
ग्रंथपाल – सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद
(मो. ९९२१३५०९५८)
—
प्रौढ साक्षरता अभियानामुळे वाचता येते तेव्हा त्यांच्या चेहर्यावरील आनंद हा समाधान देणारा असतो. जगामध्ये ज्या-ज्या क्रांती झाली. त्यामागे ग्रंथ आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत `वाचन हा माझा श्वासोच्छवास आहेʼ.
बदलते युग हे माहितीचे युग असून वाचणे ही संकल्पना आता केवळ मनोरंजन व अभ्यास यापुरते सीमित न राहता प्रत्येकाची गरज होऊ पाहत आहे. म्हणूनच या जीवनात तरून जायचे असेल, भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वतःला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार डॉ. कलाम नेहमी करत असत.


