नाशिक मिरर विशेष :
दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णव संभवं । नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुट भूषणं ।।
अर्थात, दही व शंख यांच्या तुषाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, समुद्रातून उत्पन्न झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्याप्रमाणे शोभणाऱ्या अशा ससा धारण केलेल्या सोमाला ( चंद्राला) मी नमस्कार करतो.
भारतीय संस्कृतीत चंद्राचे फार महत्व आहे. त्यामुळे बहुतेक सण, उत्सव हे चांद्र दिनदर्शिकेप्रमाणे साजरे केले जातात.
शशी, राजनिनाथ, इंदू, सुधाकर, निशानाथ, हिमांशू, शशांक, सोम आदी नावाने ओळखला जाणारा आणि कले कले ने वाढणाऱ्या चंद्राचे सर्वानाच अप्रूप वाटते. त्यामुळे त्याचे आकर्षण सर्वानाच.
“सावळा ग रामचंद्र
चंद्र नभीचा मागतो
रात जागवितो बाई
सारा प्रासाद जागतो”
खुद्द श्री रामांना देखील चंद्राचा मोह आवरता आला नाही. त्यांनी लहानपणी चंद्रासाठी हट्ट केला होता. तेव्हा सुमंतांनी आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाला खुश केले असे म्हणतात.
भाऊ नसलेल्या बहिणींचा भाऊराया चंद्र त्यामुळे असंख्य मुलांचा तो हक्काचा मामा होतो.
बालपणी
“चांदोबा चांदोबा, भागलास का
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का”
हे बडबड गीत माहीत नसलेला बालक क्वचितच असेल.
आजही बहुसंख्य घरातील लहान मुलं
” लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही” हे अंगाई गीत ऐकूनच झोपी जातात. असा हा गोजिरा, गोंडस चंद्र लहानपणा पासूनच आपल्याला आवडतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर तर तो प्रेमाचे प्रतीक वाटू लागतो आणि शांत, शीतल, लोभस, निरागस अश्या चंद्राच्या साक्षीने कितीतरी प्रियकर प्रेयसीची प्रीत फुलते आणि चांदण्यात बहरत जाते. तेव्हा
“पान जागे फुल जागे
भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला”
किंवा “उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया! उसळला प्रीतीचा!”
ह्या ओळी आवर्जून आठवतात. सौंदर्याचे प्रतीक असलेल्या चंद्राची उपमा अनेक प्रेयसिंना त्यांचे प्रियकर मोठ्या प्रेमाने देताना दिसतात. “एक लाजरा नं साजरा चेहरा चंद्रावानी फुलला गं…” आणि “कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर” हे त्याचेच उदाहरण. या लाडक्या चंद्राचे कौतुक म्हातारपणी देखील कमी होत नाही. त्यामुळे वय वर्षे ऐंशी झाले की सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन केले जाते. कारण त्यांनी एक हजार चंद्र पाहिले असतात अशी धारणा आहे.
कले कले ने वाढणाऱ्या या चंद्राचे सर्वच रूप मोहक. भाऊबीजेची चंद्रकोर जितकी नाजूक, सुरेख, तितकाच सुंदर चतुर्थीला वाट पाहायला लावणारा चंद्र. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची तर बातच न्यारी. तरी देखील माझ्या मनाला भावतो तो अश्विन महिन्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेचा तेजस्वी चंद्र. शरद ऋतूच्या गरव्यात दूध आटवताना त्या मध्ये चंद्राचे प्रतिबिंब बघत मित्रमैत्रिणींशी गप्पा गोष्टी करत साखर, सुकामेवा, केशर घातलेले दूध प्राशन करावे आणि माझे मन अलगद गर्दीतून पुन्हा चंद्रा कडेच वळावे. हे नेहमीचेच आहे. त्यावेळी मला अगदी मनापासून म्हणावेसे वाटते.
चंदा रे चंदा रे……
कभी तो जमीपर आ….
बैठेंगे, बातें करेंगे…….
कोजागरी पौर्णिमा” जाणुया काय आहे या सणाच महत्व?
अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे. या रात्री १२ वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले गेले आहे.
पुर्ण वर्षभरात फक्त याच दिवशी चंन्द्र सोळा कलांनी परिपुर्ण असल्याने या रात्रीचे हिंदु धर्मात खुप महत्व आहे. या रात्री कोजागरी व्रत आणि कौमुदी व्रत करण्यात येते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने महारास आयोजित केला होता.
कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने कितीतरी औषधींचे सेवन या रात्री केल्यास त्याचा फार उपयोग होत असल्याचे सांगीतले आहे.
लंकाधीपती रावण या अश्वीन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं आरश्याच्या सहाय्याने आपल्या नाभिव्दारे ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारूण्य प्राप्त होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगीतली आहे.
लक्ष्मीदेवी या रात्री आकाशातुन भ्रमण करते आणि ’’कोजागरती’’ अर्थात कोण कोण जागरण करतय हे पाहाते. आणि जागरण करणाऱ्यावर प्रसन्न होते त्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहातो म्हणुन देखील या दिवशी जागरण करण्याची प्रथा आहे.
अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवुन त्यात केशर आदी मसाला घालुन ग्रहण केल्यास आरोग्यास खुप लाभ मिळत असल्याने या दुधसेवनाचे देखील फार महत्व आहे. एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं हे तत्व चंद्राच्या किरणांमधुन अधीक मात्रेत शक्ति खेचण्याचे काम करतं. तांदुळामध्ये स्टार्च असल्याने ही प्रक्रिया आणखीन सुलभ होते. यामुळेच पुर्वीपासुन ऋषीमुनींनी दुध चंद्रप्रकाशात आटवण्यासंबंधी सांगीतले आहे. एकुणच ही प्रक्रीया विज्ञानावर आधारीत आहे.
पावसाळा संपल्यानंतर येणारी ही पहिलीच पौर्णिमा. पावसाच्या चार महिन्यांमधे आकाश स्वच्छ आणि निरभ्र नसतं परंतु अश्विनातल्या या पौर्णिमेला आकाश खुप दिवसांनी अगदी स्वच्छ असतं आणि चंद्र सुध्दा प्रथमच एवढा मोठा आणि समिप भासतो त्यामुळे या स्वच्छ आणि कोरडं वातावरण फार दिवसांनी वाटयाला आल्याने त्याचे अप्रुप वाटणे अगदी साहजिक असते.
रात्रभर आप्तेष्ट आणि मित्रमंडळी चंद्राच्या प्रकाशात गप्पा गोष्टी करत गाण्यांच्या भेंडया, भजनं म्हणत दुधाच्या अवतीभवती बसतात. चंद्राची किरणं त्या दुधात पडतायेत नां याची काळजी घेतल्या जाते आणि दुध आटल्यानंतर यथेच्छं त्याचे सेवन करण्यात एक वेगळीच मजा येते.
अस्थमा, दमा असणाऱ्याकरीता ही रात्र अत्यंत महत्वाची आणि उपयोगी समजली जाते. या रात्री दम्याचे औषध खीरीत मिसळुन चंद्राच्या प्रकाशात ठेवतात आणि पहाटे 4 वाजता ग्रहण केले जाते. रोग्याला संपुर्ण रात्र जागरण करावे लागते औषध ग्रहण केल्यावर 2 कि.मी. चालणे आरोग्याकरता लाभदायक ठरते.

