मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
नाशिक मिरर : नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी मदत जाहीर करावी. अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.
नाशिक जिल्ह्यात कांदा,द्राक्ष,गहू हरभरा,मका,डाळींब यासह इतर फळभाज्या व पालेभाज्यांचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेमोसमी व गारपीट सदृश्य पडलेल्या पावसामुळे लागवड झालेल्या लाल- पोळ कांद्यासह , उन्हाळ कांद्याच्या रोपांना फटका बसला आहे, पावसामुळे लाल कांदा हा जमिनीत सडू लागला आहे. तर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समोर अनेक महा संकटे उभी ठाकली आहेत.
हातातोंडाशी आलेली पिके जातात की काय या भीतीने शेतकरी रात्रंदिवस शेतीमध्ये मेहनत करत आहे ,
अशापरिस्थितीत निसर्गाने कोप केला आहे. शेतीपूरक जोडधंदा असलेल्या शेळ्या-मेंढ्या व दुग्धजन्य जनावरेही या अवकाळी पावसाने व थंडीने दगावली आहे.
तरी यासर्व नुकसान झालेल्या गोष्टींची तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी.
सद्यस्थितीत पिकांना रोगापासून वाचविण्यासाठी औषधे फवारणी करण्यासाठी लागणारी वीज देखील पूर्णवेळ मिळत नाही, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा सतत लपंडाव सुरू झाल्याने शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे हा अन्याय तात्काळ थांबवावा.
२०२० साली देखील परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते परंतु त्याबदल्यात तुटपुंजी मदत देखील शेतकर्यांना आज पर्यंत मिळालेली नाहीत. हातात आलेलं पिक निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावलेलं आहे. शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आज आली आहे तरी देशातील भाजप प्रणित केंद्र सरकारने व राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तुटपुंजी मदत न देता शेतकर्यांचे व्याजासह, पिककर्ज, वीजबीले माफ करावी.
अन्यथा शेतकर्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरणार नाही.
महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीजबील वसुली तात्काळ थांबवावी.शेतकरी आज फार मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत त्यांना दिलासा देणे हे राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.कोरोना व अतिवृष्टीमुळे शेतकरी भांडवला अभावी मेटाकुटीस आला असुन सद्यास्थितीत शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत आहे.
महावितरणने बंद केलेली रोहीत्रे ताबडतोब सुरू करावी. कृषिपंपांची खंडीत वीज पिकांना औषध फवारण्यासाठी व शेतीला पाणी देण्यासाठी तातडीने सुरू करावी. शेतकऱ्यांना मोफत विज देण्याची घोषणा सत्तेत असताना केंद्र व राज्य सरकारने केली होती. परंतु आता प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचा वीजपुरवठा ट्रान्सफार्मर बंद करण्याचा धडका लावला आहे.याचा फटका द्राक्षे व कांदा उत्पादकांना बसत आहेत,
परतीच्या पावसाने द्राक्षांवर डाऊनी ,घडकूज, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तर काढणी योग्य झालेले कांदे पावसाच्या पाण्यामुळे सर्व खराब झाले आहेत. या सर्व गोष्टींचा सरकारने व महावितरणने विचार करून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बाधीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा
अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेतर्फे छावा स्टाईलने नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी रास्ता रोको सह इतर आंदोलन करून जगाचा पोशिंदा मायबाप शेतकऱ्यासाठी आक्रमकपणे आंदोलने करण्यात येईल. व यामुळे होणाऱ्या सर्वस्वी परिणामास केंद्र व राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील करण गायकर संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना व महाराष्ट्र राज्य सुकानु समिती सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी सरकारला दिला आहे.

