राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढत असल्यामुळे चिंता वाढली असून आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये निर्बंध कडक केले जात आहे. दरम्यान, शहरातही आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून त्यानुसार दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी असेल. तसेच किल्ले, प्राणीसंग्रहालये, उद्यानेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात 1549 नवे कोरोनाबाधित आढळले
दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे.काल दिवसभरात येथे 1549 कोरोना बाधित आढळले आहेत. यात सर्वाधिक 1184 रुग्ण नाशिक शहरात आढळले आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्णांचा वाढता आलेख बघता,आरोग्य विभाग हायअलर्टवर आहे.
उद्यानं, किल्ले, प्राणी संग्रहालयं आणि पर्यटनस्थळे बंद
वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि.१२) घेतला. कळसुबाई अभयारण्य परिसरात असलेलले सर्व गड, किल्ले, मंदिरे, सांदण दरी आदी पर्यटन ठिकाणांवरदेखील बंदी घातली आहे.
खासगी कार्यालये 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी
याव्यतिरिक्त खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीस मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी कामाचे विभाजन 24 तासात करण्याचे नाशिक प्रशासनाने सांगितले आहे. खासगी कार्यालये 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे सर्व सुधारित आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केले असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
