महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ६५० कवी राहणार उपस्थित
दि. १८ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान कार्यक्रम
नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाविन्याचा ध्यास घेऊन ,समाजहिताचा विचार करून, वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करणारी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ ही केवळ संस्थाच नाही तर हे आहे एक अभियान!
संस्थेने 2002 साली सुरू केलेली बालकवी स्पर्धा म्हणजे बालवयातील विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी,त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी ,त्यांच्या सृजनशीलतेला आकार देण्यासाठी संस्थेचे सचिव माननीय गोपाळ पाटील यांनी निर्माण केलेलं मुक्त व्यासपीठ! विद्यार्थी हितासाठी केलेला कोणताही नवीन विचार किंवा उचललेलं नवीन पाऊल हे केवळ माझ्याच संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी नाही तर ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे, असे माननीय गोपाळ पाटील सर नेहमीच म्हणतात.
पहिल्या बालकवी स्पर्धेसाठी नाशिकचे प्रसिद्ध दिवंगत कवी आनंद जोर्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परंतु पुढील बालकवी स्पर्धेत त्यांचा सहवास लाभला नाही आणि म्हणून यापुढे ही स्पर्धा दिवंगत कवी आनंद जोर्वेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी घेण्यात येऊ लागली. या स्पर्धेतील सादरीकरणासाठी इयत्ता तिसरी पासून दहावीपर्यंत स्वरचित व अन्य रचित काव्य वाचनाचे गट असत. पुढे पुढे स्पर्धकांच्या मागणीनुसार यात महाविद्यालयीन गटाचा देखील समावेश करण्यात आला. दरवर्षी बालकवी ऑगस्ट महिन्यात उत्सुकतेने स्पर्धेची वाट पाहू लागले. स्पर्धेची लोकप्रियता वाढू लागली. ग्रामीण भागातील बालकवी मात्र या स्पर्धेपासून वंचित राहतात याची खंत माननीय गोपाळ पाटील सरांना नेहमीच होती आणि म्हणून स्पर्धेसाठी ग्रामीण व शहरी असे दोन गट करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. त्यासाठी सिन्नर, मालेगाव, निफाड मनमाड , येवला, इगतपुरी, घोटी, पेठ इत्यादी तालुक्यांच्या ठिकाणी महिनाभर आधी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाची टीम जाऊन आजूबाजूला खेड्यापाड्यांमधील स्पर्धक कवींना स्पर्धेत सहभागी करून घेऊ लागली. त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेले स्पर्धक शहरी स्पर्धेत देखील सहभागी होत. एकूण पाच गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाई. स्पर्धेच्या प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ बक्षीस दिली जात. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ म्हणजे अभूतपूर्व सोहळाच! स्पर्धेच्या कवितांचे परीक्षण करण्यासाठी अनेक दिग्गज कवींची मोलाची साथ असायची त्याचबरोबर बक्षीस वितरण कार्यक्रमास मा. माधुरी माटे मा. प्रकाशजी पाठक मा. अरुण म्हात्रे मा.उत्तम कोळगावकर मा. मंदार चोळकर मा.प्रकाशजी होळकर अशा अनेक प्रसिद्ध कवी, गीतकार यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मुलांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली आहे. स्पर्धेतील स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद ही आमच्या यशाची पावती! दरम्यानच्या काळात 2013 मध्ये बालकवींच्या कवितांचा काव्यसंग्रह “बालकाव्यधारा” नावाने प्रसिद्ध करण्यात आला.
2020 साली कोविड-19 च्या आपत्तीमुळे स्पर्धा कशी घ्यावी हा प्रश्न संस्थेपुढे निर्माण झाला. परंतु स्पर्धेत खंड पडू देणे मा. पाटील सरांना कदापि मान्य नव्हते. आणि म्हणून बालकवी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर परदेशी स्पर्धकांच्या सहभागातून ऑनलाइन घेण्यात येऊ लागली. गुगल फॉर्म द्वारे स्पर्धकांची माहिती व व्हिडिओ ऑनलाइन मागवून, त्याचे परीक्षण करून ,फेसबुक लाईव्ह द्वारे बक्षीस वितरण असा प्रवास मग होऊ लागला. बालकवी स्पर्धेत प्रथम पासून सहभागी होणारे स्पर्धक कवी आता तरुण झाले होते. त्यांनीही परीक्षणाची बाजू सांभाळण्याचे धनुष्य पेलले.
एकविसाव्या बालकवी स्पर्धेच्या निमित्ताने शिक्षक कवी गटाचा देखील समावेश स्पर्धेत करण्यात आला. सहभागी शिक्षक कवींच्या कवितांचा कवितासंग्रह नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आला. अशाप्रकारे स्पर्धेची घोडदौड सुरू असतानाच 2024 हे स्पर्धेचं रौम्य महोत्सवी वर्ष उजाडलं आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची वार्ता झळकली. हा दुग्ध शर्करा योग साधून स्पर्धेच्या 25 व्या वर्षी सतत 25 तास स्वरचित काव्यवाचनाचा विश्वविक्रम अर्थात रुपेरी काव्यहोत्र साकारण्याचा निर्णय संस्थेने घेतला. कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेल्या साहित्य नगरीत असा विश्वविक्रम साकारून इतिहास रचण्याचे भाग्य संस्थेस मिळणार आहे याचा आम्हास आनंद होत आहे. स्वरचित काव्य वाचनाचा हा विश्वविक्रम साकारण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लहान थोर 650 कवी सज्ज झाले आहेत. दिनांक 18 व 19 जानेवारी 2025 रोजी हा विश्वविक्रम करण्याचे योजिले आहे. दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता कै.कवी किशोरजी पाठकांच्या निवासस्थानापासून काव्यदिंडीचे आयोजन केले जाणार आहे. काव्यदिंडीची सांगता डे केअर सेंटर शाळा येथे होऊन सकाळी दहा वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होईल व विश्वविक्रमास प्रारंभ होईल.
दिनांक एकोणावीस जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता डे केअर सेंटर शाळेच्या प्रांगणात विश्वविक्रम प्रशस्तीपत्रक वितरणाचा सोहळा आयोजित केला असून, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वक्ते तसेच गुरुजी रुग्णालयाचे संचालक मा.प्रकाशजी पाठक व उंच माझा झोका फेम अभिनेत्री व अनुवादक मा.ऋग्वेदी प्रधान उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. ल जि.उगावकर संस्थेचे सचिव गोपाळ पाटील सहसचिव मा. डॉ. अंजली पाटील सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सर्व विभागांचे मुख्याध्यापक ,उपमुख्याध्यापक यांनी केले आहे.

