नाशिक मिरर वृत्तसेवा : जिल्ह्यात विविध शासकीययोजनांचीअंमलबजावणीकेल्याबद्दल यशस्वी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘जिल्ह्याचा सर्वांगीण विकास’ या कॅटेगरीसाठी पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला. केंद्रीय सचिव व्ही. श्रीनिवास यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांना ई- मेलद्वारे पत्र लिहून याबाबत कळविले आहे.

 

केंद्रीय स्तरावरील योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी व नावीन्यपूर्ण काम केल्याबद्दल संपूर्ण भारतात जिल्हाधिकारी स्तरावर मिळणारा सर्वोच्च पुरस्कार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना जाहीर झाला आहे. याआधी प्रत्येक केंद्रीय योजनेसाठी वेगळा पुरस्कार देण्यात येत होता. यावर्षी भारत सरकारने १२ केंद्रस्तरावरील योजनांसाठी एक पुरस्कार देण्याचे निश्चित केले होते.

 

एकूण ३ टप्प्यांत पुरस्कार निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रस्ताव पाठविल्यावर दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात राबविलेल्या पंतप्रधान आवास योजना (शहर), पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण), पीएम ‘स्व’निधी योजना, आयुष्मान भारत योजना यांसह १२ केंद्रीय योजनांची माहिती भारत सरकारकडून मागविण्यात आली होती. योजनांची अंमलबजावणी उत्कृष्ट केल्याने भारत सरकार निवड समितीने ऑगस्टमध्ये नाशिक जिल्ह्याचा दौरा करून योजनांच्या अंमलबजावणीची सत्यता पडताळणी केली. ही प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरू होती. मागील वर्षी निवडणूक असल्याने निवड प्रक्रिया लांबली होती. १० जानेवारीला भारत सरकारतर्फे जिल्हाधिकारी शर्मा यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे कळविण्यात आले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांचे कौतुक होत आहे.

 

उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कामासाठी पुरस्कार: 

विविध शासकीय उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल ‘नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास’ याअंतर्गत प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘पंतप्रधान पुरस्कार- २०२३’ घोषित करण्यात आला आहे. लोकप्रशासनात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण काम करणार्या अधिकार्यांना ‘पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत असतो. विशेष पुढाकार घेऊन राबविलेल्या योजना, नवीन उपक्रम, सर्वोत्तम कामगिरी या निकषावर हा पुरस्कार दिला जातो.

 

बातम्या

Don`t copy text!