राज्यात १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक
नाशिक मिरर वेबटीम : राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला .मुंबई, २ नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २४ हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव श्री संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मग, एफडीआय शेरपा प्रधान सचिव श्री भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पी.अनबलगन, आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.सुमारे ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. ही निश्चितच समाधानाची बाब आहे. कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट:
आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत . केमिकल, डेटा यासह लाॅजिस्टिक , मॅनिफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्याला उद्योजगांचे प्राधान्य:- उद्योग मंत्री सुभाष देसाई
यु के, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणूकीसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
सुभाष देसाई पुढे म्हणाले, डेटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क, मॅनिफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष सहज साध्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
