सातपूर मध्ये पार्किंगमधील गाडीवर टोल वसुल! फास्टट्रॅक प्रणाली द्वारे फसवणूक
नाशिक मिरर वृत्तसेवा :सागर आनप
केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली सुलभ करण्यासाठी सुरू केलेली फास्टट्रॅक प्रणाली नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीचे कारण ठरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सातपूर येथील रहिवासी व भाजपा चे पदाधिकारी श्री. गणेश तुकाराम बोलकर यांच्याशी घडलेला प्रसंग त्याचे उदाहरण आहे.बोलकर यांची एम.एच. १५ एफ.डब्लू ७७०७ ही इनोव्हा गाडी १३ जून २०२५ रोजी संपूर्ण दिवसभर त्यांच्या घरी, सातपूर येथे, पार्क करून ठेवलेली होती. रात्री १०:४० वाजता त्यांना मोबाईलवर निंबवली टोल प्लाझावरून ₹३२० फास्टट्रॅकद्वारे वसूल झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. ही घटना पाहून ते अचंबित झाले. कारण गाडीने त्या दिवशी कोणताही प्रवासच केलेला नव्हता.
त्यानंतर बोलकर यांनी तत्काळ फास्टट्रॅकच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित क्रमांक वारंवार व्यस्त येत असल्यामुळे त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यानंतरही टोल अधिकाऱ्यांकडून किंवा फास्टट्रॅकच्या ऍपवरून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.
या प्रकारामुळे फास्टट्रॅक प्रणालीतील तांत्रिक त्रुटी अथवा अपारदर्शकता यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “घरच्या घरी उभी गाडी असूनही टोल कट होतो, तर सामान्य नागरिक काय करणार?” असा सवाल गणेश बोलकर यांनी उपस्थित केला आहे.
तज्ञांच्या मते, अशा प्रकारचे व्यवहार झाल्यास नागरिकांनी लगेच फास्टट्रॅक ऍप व वेबसाईटवरून तक्रार नोंदवावी.टोल प्लाझावरची त्यावेळेची सीसीटीव्ही फुटेज मागवावी.बँक व पेमेंट पुराव्यांसह पोलिसांत तक्रार दाखल करावी.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा याच प्रणालीवर अवलंबून असलेल्या लाखो वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, “तांत्रिक चुकांमुळे जनतेच्या खिशाला काप बसत असेल, तर फास्टट्रॅकला ‘फसवणूक ट्रॅक’ म्हणावे लागेल का?”गाडी घरी पार्क असतानाही फास्टट्रॅक मधून ₹320 कट झाले. निंबवली टोल प्लाजा चा रात्री 10.40 वाजता मोबाईलवर पैसे कट झालेले चा मेसेज आला. या नावाचा कोणताच टोलनाका अस्तित्वात दिसत नाही. तरी सकाळी संबंधित ऑथॉरिटीशी हेल्पलाइन नंबर वर कॉल केला असता उत्तर दिले जात नाही. त्यांच्याकडून कोणतेही प्रतिसाद मिळत नाही.
-गणेश बोलकर, भाजपा शहर उपाध्यक्ष
