नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाकडून नागरिक शिक्षक गौरव समितीच्या वतीने 55 वा आदर्श शिक्षक गौरव समारंभ नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सातपूर कॉलनी च्या मनपा शाळा क्रमांक 27 येथे कार्यरत असलेले प्रयोगशील शिक्षक योगेश महारु सूर्यवंशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी नाशिक महानगरातील उपक्रमशील व नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.
सातपूर कॉलनी येथील नाशिक महानगरपालिकेच्या मनपा शाळा क्रमांक 27 येथे कार्यरत असलेले योगेश सूर्यवंशी यांनी कामगार वस्तीतील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशील शिक्षण पद्धतीचा वापर करत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी राजभाषा मंत्री उदय सामंत , सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप फडके, नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर पवार, वाचनालयाचे उपाध्यक्ष राजेंद्र निकम, वैद्य विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष संजय करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल महापालिकेच्या शिक्षणाधिकारी मिता चौधरी, मुख्याध्यापक नितीन चौधरी, मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
…..