नाशिक मिरर वृत्तसेवा :

        राज्याच्या राजकारणात मोठा उलटसुलट घडवणारी मनसे–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती बुधवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या घोषणेनंतर सातपूर परिसरात मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व मिठाई वाटप करत जोरदार जल्लोष साजरा केला. युतीची घोषणा जितकी आनंददायी, तितकीच अनेक विरोधी राजकीय गटांसाठी धडकी भरवणारी ठरली आहे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी बारा वाजता संयुक्तरित्या युतीची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर सातपूरसह नाशिक शहरात तसेच राज्यभरात मनसे–शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, तर विरोधी गोटात अस्वस्थतेची कुजबुज सुरू झाली आहे.

दरम्यान, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली सातपूर कॉलनी परिसरात भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. फटाके, गुलाल व मिठाईच्या माध्यमातून ‘युती जिंदाबाद’च्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या जल्लोषात ज्येष्ठ शिवसैनिक आनंद दिघोळे, मनसेचे ज्येष्ठ नेते सोपान शहाणे, सचिन सिन्हा, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव यांच्यासह मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राजकीय जाणकारांच्या मते, ही युती म्हणजे मराठी मतांच्या एकीचा ठोस इशारा असून येत्या निवडणुकांमध्ये अनेक पक्षांचे राजकीय गणित बिघडवण्याची क्षमता या युतीत आहे. सातपूरमधील हा जल्लोष केवळ आनंदोत्सव नसून, आगामी राजकीय संघर्षाची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

“आज केवळ युती नाही, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आलेले हे दोन पक्ष म्हणजे खरी शिवयुती आहे. काहींच्या पोटात मात्र यामुळे दुखायला सुरुवात झाली आहे.”

— सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

बातम्या

Don`t copy text!