नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिकमधील सातपूर परिसरातील गंगापूर विभागात गेल्या आठ दिवसांपासून अचानक होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नागरिकांचा संताप वाढू लागला आहे. अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, राधाकृष्णनगर, विश्वास नगर, जाधव संकुल, राज्य कर्मचारी वसाहत आदी भागांमध्ये दररोज दुपारच्या वेळेत अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास वीज अचानक जाते; मात्र ती परत नेमकी कधी येणार याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. सध्या उन्हाचा तीव्र कडाका वाढलेला असताना दुपारच्या वेळेत वीज नसल्याने नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत. उकाड्यामुळे घरामध्ये राहणे कठीण होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून हे भारनियमन सुरू आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कोणतीही पूर्वसूचना किंवा नियोजन नसताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचा फटका व्यवसायिकांनाही बसत आहे. परिसरातील शीतपेय विक्रेते, लहान व्यावसायिक आणि दैनंदिन व्यवसाय करणाऱ्यांचे कामकाज ठप्प होत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. उष्णतेच्या दिवसात थंड पेयांना मागणी वाढलेली असताना अचानक वीज गेल्याने विक्रेत्यांचे फ्रिज, कुलर बंद पडत आहेत.
नागरिकांनी सांगितले की, वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारण जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अनेकदा फोन उचलला जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नियमांनुसार वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे माहिती देणे अपेक्षित असते. मात्र येथे कोणतीही सूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
दरम्यान, “रोज दुपारच्या वेळेत वीजपुरवठा का खंडित केला जातो? यामागील कारण काय?” असा सवाल आता सातपूरकरांकडून उपस्थित होत असून विद्युत वितरण कंपनीने तातडीने याबाबत स्पष्टीकरण देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
