नाशिक मिरर वेबटीम :
सातपूरच्या मेन रोडवर रस्त्याच्या मध्ये अतिक्रमण करणाऱ्या भाजी व फळ विक्रेेेेते यांचे अखेर स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे मेनरोडने अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला आहे. सातपूरच्या मेन रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केले जात होते. रस्त्याच्या मधोमध भाजीविक्रेते व फळ विक्रेते दुकान थाटत असल्याने मेन रोडने दुचाकी घेऊन जाणेही मुश्कील झाले होते. रस्त्याच्या मधोमध दुकाने थाटणाऱ्यांना दुसरीकडे जागा द्यावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी मनपा प्रशासनास निवेदनेही देण्यात आले होते.
मात्र त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी अखेर स्वतः रस्त्याच्या मधोमध वाहने उभे करून रस्ता बंद केला होता. त्यामुळे नुकतेच सातपूर विभागात रुजू झालेल्या विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी स्वतः धाव घेत परिस्थिती समजून घेतली होती. विभागीय अधिकाऱ्यांनी यातून यशस्वी तोडगा काढत रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना क्लब हाऊसच्या भिंतीलगत जागा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ऑनलाईन तक्रार निवारण केंद्र प्रमुख तानाजी निगळ, मिलिंद जाधव यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
