नंदुरबार :नाशिक मिरर नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या एका कामगिरिला चक्क “सिंघम”ने म्हणजेच बॉलिवूड अभिनेता अजय देवगन यांनी सॅल्यूट केला आहे. अजय देवगन यांची ही व्हिडीओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नंदुरबार जिल्ह्यातील चर्चेचा विषय बनली आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड हे उपक्रमशील तत्पर प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून दुर्गम भागासाठी त्यांनी स्वतःच्या कार्यपद्धतीचा असा स्पेशल टच देणारे कार्य चालवले आहे. नंदुरबार लगतच्या साक्री तालुक्यातील सामोडे हे त्यांचे मूळ गाव. सामोडे गावातील दारू विक्री करणाऱ्या अतिसामान्य आदिवासी परिवारातून त्यांचे जीवन घडले. ही पार्श्वभूमी सांगणाऱ्या पोस्ट आणि व्हिडीओ क्लिप्स सातत्याने प्रसारीत होत असतात. डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी लिहून प्रकाशित केलेली पुस्तकेसुद्धा चर्चेत असतात. आता त्यापाठोपाठ अजय देवगन याने स्वतः डॉक्टर राजेंद्र भारूड यांचा उल्लेख केलेली व्हिडीओ क्लिप चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडिओ क्लिप मध्ये अजय देवगन हे डास निर्मूलन मोहिमेविषयी संदेश देत असल्याचे पाहायला मिळते. हा संदेश देताना देवगन यांनी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या सोलापूर येथील डास निर्मूलन कार्याचा उल्लेख केला आहे. सोलापूरच्या आदिवासी भागात केलेल्या त्या कामगिरीचे कौतुक करताना दिसतो. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या कार्याला सिंघम चा सॅल्यूट; असे आपल्या भारदस्त शैलीत अजय देवगण म्हणत असल्याचेही त्यात पाहायला मिळते. हीच गोष्ट नंदुरबार वासियांना अधिक भावली आहे.
