नाशिक मिरर वेबटीम : अखिल भारतीय मराठी साहीत्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन मार्च महीन्याच्या अखेरीस होईल. साहित्य संमेलनासाठी नाशिक, सेलू आणि पुणे तसेच अंमळनेर अशी निमंत्रणे आली होती. महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे. दिल्लीच्या मराठी संस्थांनी एकदा त्यांना दिलेले व त्यांनी स्वतःहून नाकारलेले साहित्य संमेलन पुन्हा दिल्लीला व्हावे अशी मागणी केली होती. परंतू सरहदने यंदा संधी हुकवली आहे. त्यांच्या मागणीचा विचार करून दिल्लीकरांसाठी त्यांची तयारी असेल तर एक विशेष मराठी साहित्य संमेलन देण्याचा विचार महामंडळ करील असे सुचवले होते. तसेच विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही त्यांना तसा प्रस्ताव दिला होता. पण सरहदचे निमंत्रक संजय नहार यांनीही हा प्रस्ताव नाकारला त्यामुळे दिल्लीकरांची साहित्य संमेलनाची संधी हुकली आहे .
