पंचवटी पोलिसांत मनसेची लेखी तक्रार
नाशिक मिरर वेबटीम :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नवीन आडगाव नाका येथील उड्डाणपुलाखाली लावण्यात आलेला ‘छत्रपती संभाजीनगर मार्ग’ नामफलक चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वीच लावण्यात आलेला हा फलक चोरीला गेल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत चोरांचा शोध लावून फलक परत मिळवून देण्याची मागणी केली. औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या वादात उडी घेत मनसेने सुरुवातीला नाशिकमधून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसचे फलक बदलून संभाजीनगर नावाचे फलक लावले होते. त्यानंतर शनिवारी (दि. ९) आडगाव नाका येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या मार्गाचे छत्रपती संभाजीनगर मार्ग असे नामांतर करून या चौकात थेट फलक उभा केला होता. मात्र दोनच दिवसांत हा फलक त्या जागेवरून गायब झाला. त्यामुळे राज्यातील जनतेचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत असलेल्या भावना या घटनेमुळे दुखावल्या गेल्या आहेत. या चोरीच्या प्रकारामुळे मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे. या घटनेच्या गांभीर्याकडे बघता त्वरीत चौकशी व्हावी. फलक काढणाऱ्या चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मनसेने लावलेला फलक चोरीला गेल्याचे कळल्यानंतर जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख, मनसे शहराध्यक्ष अंकुश पवार, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश जगताप, अभिजित गोसावी, सुजाता डेरे, गणेश मंडलीक आदींसह मनसैनिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. नामफलक चोरीस जाणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. नामफलक चोरण्याची हिंमत कुणाची झाली ? नामफलक चोरीला की कोणी समाजकंटकांनी हलविला ? अशा चोरट्यांवर किंवा संबधितावर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसे कडून करण्यात आली.
