नाशिक मिरर वेबटीम :
जमिनीच्या वादातून सुपारी देऊन वृध्द जमीन मालकाचा खून केल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील आंनदवली परिसरात १७ फेब्रुवारी २०२१ रोजी घडला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी कारवाई करत संशयितांना अटक केली. तसेच हा गुन्हा संगनमत करून संघटितपणे केल्याचे तपासात समोर आल्याने या टोळीवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.
आनंदवली परिसरातील रहिवासी रमेश मंडलिक यांचा १७ फेब्रुवारीला खून झाला होता. पोलीस तपासात हा खून जमिनीच्या वादातून झाल्याचे समोर आले. या गुन्ह्यात प्रत्यक्ष पुरावे किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तळ ठोकला.

पोलिस उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या तब्बल १२ जणांची ओळख पटवली व त्यातील दहा जणांना अटक केली. या कारवाईमुळे शहरातील भुमाफियाची पाळेमुळे समोर आली. त्यांची दादागिरी, संघटीत गुन्हे करण्याची पद्धत स्पष्ट झाल्याने या टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाई करण्याचाा निर्णय पोलिस आयुक्त दीपक पांडेय घेतला. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याने प्रस्ताव तयार केला. टोळीत सहभागी असलेल्या संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या वर्षातील ही तिसरी मोठी टोळी असून त्यावर मोक्का कारवाई झाली आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार भुमाफियांवर मोक्कानुसार कारवाई केल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. भविष्यातही अश्या भूमाफियाना आवरण्यासाठी थेट महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

या आरोपी विरोधात झाली मोक्का कारवाई

सचिन त्रंबक मंडलीक (मुख्य सुत्रधार), अक्षय जयराम मंडलीक, भुषण भिमराज मोटकरी, सोमनाथ काशिनाथ मंडलीक, दत्तात्रय काशिनाथ मंडलीक, नितीन पोपट खैर, आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान बाळु चांगले, बाळासाहेब बारकु कोल्हे, गणेश भाउसाहेब काळे, सागर शिवाजी ठाकरे, वैभव अनिल वराडे, जगदीश त्रंबक मंडलीक, रम्मी परमजिसिंग राजपूत, मुक्ता एकनाथ मोटकरी, गोकुळ काशिनाथ आव्हाड, अमोल हरिभाउ कालेकर, सिध्देष्वर रामदास आंडे, दत्तात्रय अरूण सुरवाडे, नारायण गोविंद बेंडकुळे

महाराष्ट्रात प्रथमच लॅन्ड माफिया/भु-माफियावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने लॅन्ड माफियांकडुन त्रस्त असणारे सामान्य व गरिब भु-धारक यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायदयाच्या कारवाईमुळे वचक निर्माण होवुन गोरगरिब, सर्वसामान्य नागरिकांच्या मिळकती बळजबरीने बळकावणाऱ्या गुन्हेगारांविरूध्द झालेल्या अशा कारवाईमुळे भु-माफिया होण्यास धजावणार नाहीत.
-दीपक पांडेय, पोलिस आयुक्त,नाशिक शहर

Don`t copy text!