दिवाळीनंतर सुरू होणार्‍या विवाह सोहळयांना परवानगी देण्याची केली मागणी

सातपूर : नाशिक मिरर वृत्तसेवा    लॉकडाऊनमुळे सर्व सांस्कृतीक, धार्मिक, संमारंभावर बंदी आल्यामुळे मंडप व्यावसायिक, लाईट व फ्लॉवर डेकोरेटर्स अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे जिल्हयातील इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रिला देखील मोठा फटका असला आहे. कोरोनामुळे लग्नसराईचा हंगाम तर हातचा गेला मात्र आता दिवाळीनंतर सुरू होणार्‍या विवाह सोहळयांना परवानगी देण्यात यावी.तसेच यावर आधारित मंडप, डेकोरेटर्स, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही परवानगी देण्यात यावी याकरीता नाशिक जिल्हयातील मंडप, डेकोरेशन आणि इव्हेंट चालकांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी नाशिक मधील मंडप व्यवसायिक याची भेट राज ठाकरे यांच्या सोबत घडवून आण्यास पुढाकार घेतला.व्यावसायिकांनी ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. नाशिकमध्ये मंडप व्यवसायापासून ते बँडपर्यंत सुमारे ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. कोरोनामुळे सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मंडप व्यावसायिक आणि त्यांना पूरक मंडप डेकोरेटर्सवरील कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. शुभकार्याच्या संयोेजनासाठी इव्हेंट इंडस्ट्रि निर्माण झाली. मंडपापासून ते बँडपर्यंत सर्व काही एकाच छताखाली मिळण्याची सोय झाल्याने नाशिकमध्येही ही इंडस्ट्रि मोठया प्रमाणावर वाढू लागली. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने शासनाने लॉकडाऊन केल्याने समारंभ थांबले. त्यामुळे मंडप, डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेमेंट कंपन्याही अडचणीत आल्या. त्यामुळे या व्यावसायिकांची होरपळ कशी थांबेल याकडे आपण शासनाकडे आमच्या व्यथा मांडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत शासनाशी तसेच स्थानिक प्रशासनाशी आपण चर्चा करू असे आश्वासन राज ठाकरे यांनी व्यावसायिकांना दिले. यावेळी मनसेचे गटनेते सलीम शेख , जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, शहर सचिव अंबादास आहिरे , असोसिएशनचे विनोदजी दर्याणी ,सुभाष नाईकवाडे , गणेश मटाले, दाऊद कादरी, कैलास गांगुर्डे आदि उपस्थित होते.

 

बातम्या

Don`t copy text!