अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही आरास केली आहे.
नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
पंचवटीतील हिरावाडीत राहणारे प्रसाद देशपांडे यांनी गौरीच्या आरासमध्ये 300 हून अधिक पुस्तके प्रदर्शित केली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे यावर्षी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही आरास तयार केली आहे. ही आरास पाहण्यासाठी साहित्यप्रेमींनी आवर्जुन भेट दिली.
वाचनाचे महत्त्व सांगून वाचन संस्कृती नवीन पिढीच्या मनात रुजत ठेवण्यासाठी, अनेक प्रसिद्ध साहित्यिकांची पुस्तके या आरासमध्ये ठेवली आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकांवर त्या त्या कवी, लेखकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामध्ये कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, भालचंद्र नेमाडे, रत्नाकर मतकरी, सई परांजपे, रणजीत देसाई आदींचा यात समावेश आहे.
सध्याच्या पिढीत वाचन कमी होत असतानाच नाशिकमधील प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे `ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाद्वारे पुस्तक वाचन चळवळ सुरू केली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात व त्याचबरोबर परदेशातही हा उपक्रम सुरू आहे. अनेक मराठी बांधवांना आपली संस्कृती आणि मराठी पुस्तके वाचण्यासाठी हे प्रतिष्ठान मोफत सेवा देते.
देशपांडे यांच्या घरातील या देखाव्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या विचारातून `ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे सहकार्य लाभले आहे.
देशपांडे परिवार गेल्या वीस वर्षापासून वेगवेगळ्या विषयांवर सामाजिक प्रबोधनात्मक देखावे सादर करीत आहेत. या कामात त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदाने सहभागी होत असते.
