नाशिक मिरर विशेष :
डावंखुर असण्याचा संबंध बुद्धी, कौशल्याशी जोडतात तर काहींच्या मते असे नसते. एकूण काय ही आपल्याला निळलेली नैसर्गिक देणं आहे तेव्हा आहे तशी स्विकारायला हरकत काय?
आपल्याला विज्ञान कळते, आपण ते मानतो देखील मग तरी अश्या गोष्टींचा बाऊ होतो?
“बदल” हा काही घरात नाही तर मनामनात होणे गरजेचे आहे.वाचू या सविस्तर …

राधा ही रिद्धी सिद्धी या दोन गुणी, संस्कारी मुलींची सुशिक्षित आई. रिद्धी पाचवीत तर सिद्धी यंदा शाळेत जाणार होती. घरात मोठी बहीण असल्याने सिद्धीला अभ्यासात रुची निर्माण झाली होती. ताई च्या वह्या पुस्तके घेणे, त्यावर पेन पेन्सिलने रेगोट्या मारणे यात तिला मौज वाटे. त्यात ती छान रमत असे. असेच एके दिवशी सिद्धीने ताई ची पेन्सिल घेतली आणि म्हणाली, ताई बघ “मी कसा गोल काढते”….ताई पण आपल्या लहान बहिणीचे कौतुक करीत बसली. तेवढ्यात त्यांचे आजोबा आले. “आजोबा बघा, मी कित्ती छान गोल काढते, बघा तरी”. सिद्धी आजोबांना दाखवू लागली. आजोबांनीही वाह छानच की! म्हणून कौतुक केले. पण लगेचच म्हणाले, “बाळा पेन्सिल उजव्या हातात धरावी”. मग जरा चिडक्या स्वरातच पुटपुटले, “आईचीच सावली पडलेली दिसते”. त्या छोट्याशा जीवाला पेन्सिल उजव्या हातात धरायची हे कळाले मात्र आईची सावली पडणे म्हणजे काय? हे काही झेपले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवायला ती आई कडे गेली आणि तिने विचारले “आईची सावली पडणे म्हणजे काय गं”? असे का विचारतेय बाळा? म्हटल्यावर रिद्धीने सारा वृत्तांत सांगितला. राधाला राग तर आला पण मुलींसामोर नको म्हणून तिने समजावले “अगं कुठलेही शुभ काम करताना उजव्या हाताने करावे. त्यामुळे आजोबा बोलले असतील”. जिज्ञासूच मूल ते!, लगेच म्हणाली अगं नमस्कार करणे चांगली गोष्ट आहे ना? मग देवाला आपण दोन्ही हाताने नमस्कार करतो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणताना ही दोन्ही हातांच्या तळव्यांकडे बघूनच धरणी मातेला वंदन करतो ना? “हो गं बाई तुझे अगदी बरोबर आहे. आपण ह्यावर नंतर बोलू ह”, असे म्हणून आई ने विषय बदलला. हिला काय सांगावे? हा राधा पुढे प्रश्नच होता.

दुपारचे सगळे काम आवरल्यावर ती पेपर वाचत बसली तेव्हा सकाळचा विषय आठवला. तिने स्वतः कधीही मुलींना उजव्या डाव्या वरून टोकलं नव्हतं. कारण ती स्वतः बरीच कामे डाव्या हाताने करायची. अगदी स्वयंपाक करताना देखील डावा हात वरचढ असे. तिला पूर्वीचे दिवस आठवले. नवीन लग्न होऊन सासरी आली तेव्हा तीच्या डावखोरेपणाबद्दल खूपदा ऐकावं लागलं होत. विशेषतः वाढताना. ती आमटी, भात हे हमखास डाव्या हातानेच वाढत असे. तेव्हा एखादा तरी तिला टोकतच असे “अगं उजव्या हाताने वाढावं” राधा ला नेहमी वाटे डाव्या हाताने वाढले तर पदार्थाची चव बदलणार आहे का, मग कश्या साठी हे डावं उजवं? एकदा तर ती रिक्षाने जात होती. प्रवास झाल्यावर तिने चालकाला पैसे दिले तर तो ही बोलला, “मॅडम उजव्या हाताने द्या ना” तेव्हा केवढी वैतागली होती ती. पण काहीच करू शकत नव्हती . तिला तेव्हा ही वाटले होते, उजव्या हाताने काम करणं चांगलंच आहे परंतु एखाद्याला उजवा हातच नसेल तर तो काय सतत अपशकुन च करत असतो काय?
आज इतक्या वर्षा नंतर आपल्या मुलीलाही हेच ऐकावे लागल्या मुळे जग अजून एकाच ठिकाणी असल्या सारखे तिला भासले. तिच्या मनात सहजच विचार आला आपण आपल्या स्वतःच्या अवयवांना समान न्याय देऊ शकत नाही तिथे सर्वांना समान न्याय कसा देऊ शकू?

राधाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. डावखोरेपणा बद्दल स्त्रीला जेवढे टोकले जाते तेवढे पुरुषांना नाही. कुणाला ते तितकेसे खटकत देखील नाही. आज आपल्याला प्रसिद्ध डावखुरे पुरुष माहीत आहेत पण तेवढयाच महिला माहीत आहे का? इंडियन लेफ्ट हँडर्स क्लब नुसार, मदर तेरेसा, मुलाखतकार ओपरा विंफ्रे, अभिनेत्री अँजेलीना ज्युलि, जेष्ठ गायिका आशा भोसले, बॉक्सिंग पटू मेरी कोम, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या सर्व महिला डावखुऱ्या आहेत. या सगळ्या प्रतिभावांत आहेत. दावखुरेपणा तिथे अडसर ठरला नाही.
खरंतर डावं उजवं असे काही मानू नये. आपल्या मेंदूच्या रचने नुसार आपला उजवा आणि डावा हात कार्य करीत असतो. त्याचा जनुकांशी संबंध आहे परंतु त्या बाबतचे नेमके कारण शास्त्रज्ञ अजुनी शोधत आहेत. विविध संशोधनाअंती निरनिराळ्या शास्त्रज्ञांचे वेगवेगळे निष्कर्ष आहेत. कुणी डावंखुर असण्याचा संबंध बुद्धी, कौशल्याशी जोडतात तर काहींच्या मते असे नसते. एकूण काय ही आपल्याला निळलेली नैसर्गिक देणं आहे तेव्हा आहे तशी स्विकारायला हरकत काय?
आपल्याला विज्ञान कळते, आपण ते मानतो देखील मग तरी अश्या गोष्टींचा बाऊ होतो?
“बदल” हा काही घरात नाही तर मनामनात होणे गरजेचे आहे.

 

लेखिका : – रेणू कुबडे (एम.एस.सी.ऍग्रीकल्चर) नाशिक
9372206022

बातम्या

Don`t copy text!