नाशिक मिरर :
येथील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या युनियनच्या वादातून नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणारा विनोद ऊर्फ विनायक बाळासाहेब बर्वे याने केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरोपीला चौकशी साठी सातपूर नाशिक पोलिसांनी भिवंडी वरून ताब्यात घेतले आहे.
सातपूर औद्योगिक वसाहत येथील कार्बन नाका जवळील इंडियन रायटिंग कंपनी समोर म्हसोबा महाराज मंदिर या ठिकाणी अमोल इघे यांच्यावर दि.२६ रोजी
सकाळी सात वाजेच्या दरम्यान धारदार शस्त्राने मानेवर वार करून निर्घृण पणे हत्या करण्यात आली. कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांची प्राणज्योत मावळली.
दिवसा ढवल्या घडलेल्या दुर्देवी घटनेने सातपूरसह अख्खे नाशिक शहर देखील हादरले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हजारोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व मित्र परिवाराने हल्लेखोरांला अटक करा अशा मागणीसाठी सातपूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जिल्हा शासकीय रुग्णालया बाहेर गर्दी जमली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धमाल, पोलीस उपायुक्त विजय खरात सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, गुन्हे शाखेचे सतीश घोटेकर , आनंद वाघ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन रायटिंग कंपनीत भाजप कामगार मोर्चा संलग्न महाराष्ट्र राज्य कामगार संघ व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाराष्ट्र वंचीत कामगार संघटना यांची युनियन होती व याच कंपनीतील कामगार व नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विनोद बर्वे याने युनियन संदर्भात चर्चा करण्यासाठी सदर ठिकाणी बोलावले होते. आणि याच युनियन लावण्याच्या वादातून हा धक्कादायक खूनाचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. सातपूर परिसरात झालेल्या या निर्घृण नागरिकांमध्ये दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान आरोपी अटकेची मागणीसाठी सातपूर पोलीस स्टेशन समोर घटनेनंतर भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले. यावेळी आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक दिनकर पाटील, महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, हिमगौरी आडके, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शंभू बागूल, विजय साने, मुकेश शहाने,यासह सर्व सातपूर चे भाजपा नगरसेवक पदाधिकारी यांसह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी सकाळ पासून पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन धरले होते.
दरम्यान शहरात या आठवड्यातील ही तिसरी हत्या आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या हत्येने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत संतापाचे वातावरण आहे. त्यांनी याबाबत पोलिस निष्क्रीय आहेत. दोषींना तातडीने अटक न केल्यास प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करण्यात यावी.
पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.
