नाशिक पश्चिम मतदार संघात पक्षा अंतर्गत कलह
विद्यमान आमदाराविरोधात पदाधिकाऱ्यांनी ठोकले शड्डू
नाशिक मिरर वृत्तसेवा: सातपूर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांच्या हालचालीना वेग आलेला असतांना नाशिक पश्चिम मतदार संघात मात्र भाजपात पक्षा अंतर्गत कलह दिसून येत आहे. लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी न देता नवीन चेहरा देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहे. विद्यमानांसह इच्छुकांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले असून आपल्यालाच उमेदवारी मिळणार या अविर्भावात प्रचाराला वेग आला आहे.
दरम्यान, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपात मात्र वेगळे चित्र आहे. विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात इच्छुकांसह स्थानिक पदाधिकारी एकवटले असून त्यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. विद्यमान आमदारांनी संघटना वाढीसाठी काही काम केलले नसल्याचा आरोप करत इतरांचा “कार्यक्रम” करण्यात त्याना स्वारस्य असल्याचा आरोप जगन पाटील यांनी केला आहे.
विद्यमान आमदारांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही. नवीन उद्योग आणला नाही,रोजगार उपलब्ध करून दिला नसून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेतही त्यांनी पक्ष विरोधी काम केल्याचा आरोप माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला आहे.
बाळासाहेब पाटील यांनी निवडून येणारा उमेदवार देण्याची मागणी केली. विद्यमान आमदारानी कोणालाही पद मिळवू दिले नसल्याचा आरोप कैलास आहिरे यांनी केला. १० वर्ष संधी दिली मात्र विकास झाला नसून उमेदवार बदलला नाही तर पक्षाला गालबोट लागू शकतो असेही अहिरे म्हणाले.
सिमा हिरे यांनी पक्षात नेहमी डावलले, कुठलीच मदत झाली नाही, मात्र पक्ष निष्ठा असल्यामुळे पक्षात राहिलो असल्याचे स्वप्नील पाटील यांनी संगितले असून मतदार संघात सीमा हिरे यांच्या विरोधात वातावरण असल्याचे पाटील म्हणाले.
नवीन उद्योग आणणे तर दूरच, आहे त्या उद्योगाचे तुकडे पाडून विक्री करत नातेवाईकाच्या नावावर प्लॉट घेण्याचा धंदा आ. सिमा हिरे यांनी केला असल्याचा थेट आरोप भाजपा कामगार आघाडीचे विक्रम नागरे यांनी केला आहे.
दहा वर्षांपूर्वी माझ्या मुलाला पराभूत करत पक्षविरोधी काम आ. सिमा हिरे यांनी केले असल्याचा आरोप माजी सभागृह येथे दिनकर पाटील यांनी केला आहे. नवीन उमेदवार द्यावा अशी मतदारांची मागणी आहे. उमेदवार पडू नये,भावनांचा विचार झाला पाहिजे,सर्व्हेत एक नंबर येऊ शकत नाही,निवडून येणाऱ्याला उमेदवारी द्या अशी मागणी दिनकर पाटील यांनी केली आहे. यावेळी लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील,शशिकांत जाधव,मुकेश सहाणे,बापू सोनवणे,धनंजय बेळे,कैलास आहेर,विक्रम नागरे, बाळासाहेब पाटील,स्वप्नील पाटील,जगन पाटील आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
मला बैठकीबद्दल कल्पना नाही. सर्व आरोप खोटे आहेत. मात्र प्रत्येक निवडणुकीवेळी हे पाच पांडव एकत्र येवून विरोध करत असतात. त्याकडे मी लक्ष देत नाही. मतदार संघात भरपूर विकास कामे केली आहे.पक्ष नेतृत्व जे ठरवेल ते मला मान्य राहील – सिमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम विधानसभा
