कृत्रिम पद्धतीने पिकवलेले आंबे ठरत आहेत आरोग्यास घातक; कार्बाईड वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

 

नाशिक मिरर वृत्तसेवा : सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असून, अक्षय तृतीया या सणासुदीच्या काळात आंब्यांची मागणी वाढली आहे. मात्र हीच संधी साधत काही व्यापाऱ्यांकडून आंबा आणि इतर फळे कृत्रिम पद्धतीने कॅल्शियम कार्बाईड व अॅसिटायलीन गॅसच्या साह्याने पिकवली जात आहेत. ही प्रक्रिया मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून, अशा रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या फळांचा सेवन केल्यास चक्कर येणे, उलट्या होणे, त्वचेवर व्रण येणे यासारख्या गंभीर समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

 

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) ने अन्नसुरक्षा व मानके प्रतिबंध आणि विक्रीवरील निर्बंध नियमन 2011 चे उपनियम 2.3.5 नुसार कॅल्शियम कार्बाईडचा वापर प्रतिबंधित केला असूनही, त्याचा सर्रास वापर होत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) तपासणी मोहीम हाती घेऊन, कार्बाईडचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात तात्काळ आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या नाशिक पश्चिम विधानसभा उपमहानगर संघटक रोहिणी देवरे, रवींद्र देवरे यांनी केली आहे.

 

बाजारात विक्रीस येणारी फळे रासायनिक प्रक्रियेमुळे लवकर पिकवली जात असल्याचा प्रकार अनेकदा समोर आला आहे. विशेषतः अक्षय तृतीयेनिमित्त वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत व्यापारी हा धोका पत्करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, प्रशासनाने यावर कठोर पावले उचलावी, अशी नागरिकांचीही जोरदार मागणी आहे.

Don`t copy text!