नाशिक मिरर वृत्तसेवा: दिंडोरी

तालुक्यातील मानोरी गावात सुरू असलेल्या ‘श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कूल’ या संस्थेने शासनाची कोणतीही परवानगी न घेता विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शाळेच्या विद्यमान विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता असून, शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. जितेंद्र शर्मा यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यांनी सांगितले की, संबंधित संस्था परवानगीविना शाळा चालवत असून, ६० हजारांहून अधिक फी घेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले गेले आहेत. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ बनावट डिजिटल स्टॅम्प असलेली प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

 

रुकीन जाधव यांनी नमूद केले की, “संबंधित संस्थेशी संपर्क साधूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. जर लवकरच कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू.” यासोबतच त्यांनी जिल्ह्यात यापुढे अशा प्रकारच्या बोगस शाळा सुरू होऊ नयेत म्हणून शिक्षण खात्याने विशेष चौकशी समिती स्थापन करावी आणि अशा संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

 

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण विभागाने तात्काळ तपासणी करून, नियमबाह्य शाळेवर कायदेशीर कारवाई करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जनतेतूनही होत आहे.

 

संबंधित संस्थेबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी आल्या आहेत.  परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. याबाबत तत्काळा योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. पुढील काळात विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. जिल्ह्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर शाळांची शासनाने चौकशी करण्याची गरज आहे.

 -लकी जाधव, युवा अध्यक्ष, अ. भा. आदिवासी विकास परिषद

बातम्या

Don`t copy text!