नाशिक मिरर वृत्तसेवा :
खंडणी आणि गोळीबार प्रकरणात संशयित असलेल्या आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांच्या गुन्हेगारी कारभाराचा ‘किल्ला’ असलेल्या अनधिकृत इमारतीवर नाशिक महापालिकेने गुरुवारी (दिनांक १६ ऑक्टोबर) बुलडोजर चालवला. पी.एल ग्रुप, लोंढे टोळीचा कारभार जेथून चालत होता, त्याच इमारतीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या अवैध मालमत्तांवर महापालिकेने कठोर कारवाईचा ‘हातोडा’ चालवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयटीआय सिग्नल-खुटवडनगर मार्गावर असलेली प्रकाश लोंढे यांची ही अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई गुरुवारी सकाळी नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू करण्यात आली.
कारवाईचे नेमके कारण काय?
लोंढे यांच्या या इमारतीचे बांधकाम नंदिनी नदीच्या पूररेषेत (Flood Line) आढळले होते. यासंदर्भात महापालिकेने लोंढे यांना कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत लोंढे किंवा त्यांच्यावतीने कोणीही कागदपत्रे सादर केले नाहीत. मुदत संपल्याने अखेर पालिकेने आज ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली. बुधवारी सायंकाळी देखील परिसरातील काही अतिक्रमण पालिकेने हटवले होते.
कारभाराच्या ठिकाणावरच कारवाई:
विशेष म्हणजे याच इमारतीमधून प्रकाश लोंढे यांच्या टोळीचा सर्व कारभार चालत होता. त्यामुळे गुन्हेगारी साम्राज्याच्या ‘किल्ल्या’वरच कारवाई झाल्याने या घटनेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
महापालिका या कारवाईनंतर परिसरातील लोंढे यांच्या इतर बेकायदा बांधकामांवरही हातोडा चालवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक राजकारणातही या कारवाईचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
गुन्हा दाखल, वसुलीचीही तयारी :
या अतिक्रमणप्रकरणी प्रकाश लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेला जो काही खर्च येणार आहे, तो सर्व खर्च लोंढे यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. अनधिकृत पक्के बांधकाम तोडण्यासाठी जेसीबीसाठी रस्ता नव्हता, तो तयार करून इमारत पाडण्याचे काम सुरू आहे आणि दिवसभरात इमारत जमीनदोस्त करण्याचा अंदाज आहे.
फरार मुलाचा शोध सुरू :
दरम्यान, सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी यापूर्वीच त्याचे वडील प्रकाश लोंढे आणि भाऊ दीपक लोंढे या दोघांना सहआरोपी केले आहे आणि त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे.
