शेतकरी-रहिवाशांचा तीव्र विरोध!

​विकासकामांना विरोध नाही, पण अन्यायी कारवाई थांबवा

संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन;

आमदार-नेत्यांचा पाठिंबा, प्रशासनाचे ‘योग्य तोडगा काढू’चे आश्वासन.

नाशिक मिरर वृत्तसेवा:

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून आणि रस्ता रुंदीकरणासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (NMRDA) त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आज बुधवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत जोरदार आंदोलन केले. महापालिका हद्दीलगतच्या पिंपळगाव बहूला येथून त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी फाट्यापर्यंत ही मोहीम सुरू करण्यात आली असून, ५०६ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

​त्र्यंबक रोडवरील सुमारे ३५ किलोमीटर लांबीचा रस्ता ३२८ फूट (१५० फुटांवरून) रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यरेषेपासून दुतर्फा असलेली ४० ते ५० वर्षे जुनी घरे, दुकाने आणि जनावरांचे गोठे पाडण्यात येत आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील असूनही, रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्याने ही बांधकामे हटविली जात आहेत.

 

शेतकऱ्यांचा संताप आणि आंदोलन:

दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने आज सकाळी महिलांसह वृद्ध नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आम्हाला विकासकामांना विरोध नाही, पण आमच्या घरांवर आणि उपजीविकेच्या साधनांवर अन्यायी पद्धतीने कारवाई करणे अमान्य आहे,” अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली.

 

​शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या नावावर सातबारा उतारा आणि सर्व मालकी कागदपत्रे असताना शासन त्यांच्या जमिनीवर आणि बांधकामांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आणि मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न:

शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी माकपचे नेते, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, आमदार सरोज अहिरे, तेजस भावले, विठोबा कापसे, कैलास खांडबहाले, समाधान गुंबाडे, दत्तू ढगे, सीमा घुगे, कावेरी घुगे यांच्यासह परिसरातील सरपंच आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले होते. अनेकांनी यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

परिणाम आणि प्रशासनाचे आश्वासन:

आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, विकासकामे नियमानुसार सुरू आहेत आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर नक्कीच योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

​नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असले तरी, अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांवरून विस्थापित व्हावे लागत असल्याने या मोहिमेला संघर्षमय रूप आले आहे.

बातम्या

Don`t copy text!