माहूर (प्रतिनिधी):
चैत्र शुद्ध पंचमी म्हणजेच ‘लक्ष्मी पंचमी’चे औचित्य साधून साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माहूरगड येथे कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या चरणी द्राक्षांची भव्य आरास करण्यात आली. गेल्या ११ वर्षांची अखंड परंपरा जपत डोखळे परिवारातर्फे ही अनोखी सेवा अर्पण करण्यात आली.
भक्ती आणि समृद्धीचा संगम
लक्ष्मी पंचमी हा दिवस संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित असतो. या शुभ मुहूर्तावर माहूर गडावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. चैत्र नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे रेणुका मातेच्या गाभाऱ्यात केलेली फळांची सजावट. श्री जनार्धन हरिभाऊ डोखळे आणि सौ. सुमन जनार्धन डोखळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यंदा बागांची तोडणी झालेली असतानाही, मातेवरील श्रद्धेपोटी द्राक्षे खरेदी करून ही सेवा अविरत सुरू ठेवण्यात आली.
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
यावेळी द्राक्ष आरास करण्यासोबतच कुलस्वामिनीची विधीवत ओटी भरून महाआरती करण्यात आली. तसेच कुमारिका पूजन करून उपस्थित सर्व भाविकांना द्राक्षांचा प्रसाद वाटप करण्यात आला. या मंगलमय सोहळ्यासाठी सचिन जनार्धन डोखळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मान्यवरांचे सहकार्य
हा अविस्मरणीय सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिराचे मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी, संस्थानचे सर्व पदाधिकारी, तसेच माऊली भक्त निवासचे जयस्वाल काका, ज्येष्ठ पत्रकार संजयजी घोगरे, डॉ. अर्चना गिरी मॅडम आणि व्यावसायिक मित्र संजयजी भास्करवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
”आई रेणुकेच्या चरणी अशीच सेवा कायम घडत राहो,” अशी भावना यावेळी डोखळे परिवाराने व्यक्त केली. गडावर झालेल्या या द्राक्ष आरास दर्शनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
