याकाळात रुग्णाने स्वतः व काळजीवाहू व्यक्तीने सातात्याने प्रकृतीकडे लक्ष ठेवावे व सूचनांचे तंतोतंत पालन करावे. दररोज सकाळ सध्याकाळ डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्या प्रकृतीबद्दल माहिती द्यावी व त्याचवेळी डॉक्टरांनीसुध्दा आवश्यक त्या सूचना देऊन योग्य औषधोपचार करावा व गरज भासल्यास रुग्णालयामध्ये दाखल होण्यास संदर्भ सेवा सुध्दा द्यावी. रुग्णाला विहित कालावधी नंतर कोणतेही लक्षण न आढळल्यास रोगमुक्त ठरविण्यात येईल. त्यांनी पुढे देखील काही दिवस घरीच राहुन प्रकृतीवर लक्ष ठेऊन स्वत:ची काळजी घ्यायची आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 3 हजार 511 नागरिकांनी गृह विलगीकरणाचा लाभ घेतला आहे. यात चंद्रपूर शहर-1724, बल्लारपूर-326, राजुरा-88, गडचांदूर 76, कोरपना-4, जिवती-1, गोंडपिंपरी-27, मुल-325, सावली-22, नागभीड-171, सिंदेवाही-2, ब्रह्मपुरी-231, चिमूर-118, वरोरा-156 आणि भद्रावती-250 नागरिकांचा समावेश आहे.
संबधित व्यक्तींना गृह विलगीकरण संदर्भात हवी असलेली माहिती किंवा तात्काळ सेवेसाठी 07172-274161, तक्रार 274162, 274163 या प्रशासनाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे. अशी माहिती गृह विलगीकरण कक्षाचे नोडल अधिकारी डॉक्टर डॉ.राहुल भोंगळे (9823448896) यांनी दिली आहे.
तरी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारणाऱ्या रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) ही एक वैयक्तिक तसेच सामाजिक जाबाबदारी व कर्तव्य समजून प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे. तसेच पात्र रुग्णांनी गृह विलगीकरणात असताना आपल्या कुटुंबियांना संसर्ग होणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
