सर्वसामान्य कामगारांची पैशांअभावी वैद्यकीय उपचारासाठी होणारी जीवघेणी धावपळ थांबणार
नाशिक मिरर वेबटीम : सर्वसामान्य कामगारांची पैशांअभावी वैद्यकीय उपचारासाठी होणारी जीवघेणी धावपळ यापुढे थांबणार आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) एम्प्लोईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन विमाधारकांना इमर्जन्सीमध्ये खासगी रुग्णालयांतही उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. कामगार संघटना समन्वय समितीचे जनरल सेव्रेटरी एस. पी. तिवारी यांनी ही माहिती दिली.ईएसआयसीच्या बोर्डाची सोमवारी बैठक झाली. यावेळी विमाधारकांना खाजगी रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी आपत्कालीन परिस्थिती अर्थात इमर्जन्सीमध्येही खासगी रुग्णालयात दाखल होण्यासाठी ईएसआयसीच्या रुग्णालयाचा रेफरन्स देणे बंधनकारक होते.ही अट शिथिल करण्यात आली आहे.
यापुढे हृदयविकाराचा झटका येणे यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत थेट खाजगी रुग्णालयात दाखल होता येणार आहे. ईएसआयसी पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांत ही सेवा कॅशलेस असेल. मात्र पॅनेलवर नसलेल्या खासगी रुग्णालयांत विमाधारकांना उपचारावर सुरुवातीला स्वतः खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर ईएसआयसीकडे संबंधित कागदपत्रे सादर करून खर्चाची भरपाई मिळवता येईल. केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेसंबंधी दरांनुसार ही भरपाई दिली जाणार आहे, असे तिवारी यांनी स्पष्ट केले. विमाधारकाच्या घरापासून १० किलोमीटर अंतरावर ईएसआयसी वा पॅनेलवरील रुग्णालय नसेल, तरच ईएसआयसी पॅनेलवर नसलेल्या खाजगी रुग्णालयांत उपचार घेता येणार आहेत. ईएसआयसी यापुढे ज्या रुग्णालयांत आरोग्य सेवा उपलब्ध करेल, तेथील सेवेवर स्वतःचेच नियंत्रण ठेवणार आहे. अर्थात रुग्णालयांची जबाबदारी आता राज्यांवर सोपवली जाणार नाही.
