कलावंतांच्या अंगी असलेली प्रतिभा कधीही लपून राहत नाही ती समोर येतेच, नाशिक मधील अवघ्या नऊ वर्षाच्या मयुरेशने त्याच्या कलेवर प्रभुत्व मिळविले आणि याची नोंद घेत तसेच त्याच्या रंगरेषांच्या जादूगारीला दाद देत सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या जयभवानी मित्रमंडळ नाशिकरोड तर्फे त्याला नुकताच ‘नाशिकरत्न’ पुरस्कार देण्यात आला. जयभवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष तसेच थोर समाजसेवक श्री विलास दिलीप थोरात यांच्या हस्ते मयुरेश राजेंद्र आढाव याला ‘नाशिकरत्न’ पुरस्कार देण्यात आला. श्री विलास थोरात स्वतः एक चांगले चित्रकार असून त्यांनी मयुरेशची प्रतिभा ओळखली आणि मयुरेशची कला शैली बघून मला आपल्यात एक मोठा चित्रकाराचे रूप दिसते आहे आणि त्याच्या सारख्या हुशार कलाकाराची गरज अवघ्या महाराष्ट्राला आहे अश्या आशयाचे सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन ‘नाशिकरत्न’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे. मयुरेशने आजवर अनेक बक्षिसे प्राप्त केली असून सध्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित ‘रेडएफ एम आयोजित टॅलेन्ट हंट’ चित्रकला विभागातून स्पर्धेत नाशिकच्या वतीने भाग घेतला आहे. त्याला संदीप पगारे, अंबादास नागपुरे, ज्ञानेश्वर डंबाळे, नंदिनी खुटाडे, योगेश शेरमाळे, मनस्वी सोनवणे या कलाशिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे.
नाशिक शहरातील हा उदयोन्मुख बालकलाकार कल्पकता आणि रंग-रेषांच्या अचूक योजनेत गुंतलेला असून मोठा चित्रकार होण्याची स्वप्ने बघत आहे त्याच बरोबर त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. सध्या मयुरेशने आपल्या विविधरंगी आणि विविध शैलीतील चित्रांची मोहिनी नाशिक मधील सर्वच चित्रकारांवर घातली आहे .मध्यमवर्गीय कुटूंबातील या नऊ वर्षाच्या मयुरेशने युट्युब आणि इंस्टाग्राम वरील व्हिडीओ पाहून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या चित्रकारांच्या चित्रांची प्रेरणा घेऊन त्यांनी आपली चित्रकला विकसित केली आहे. नाशिकरोडच्या जयभवानी रोड वरील गवळीवाडा भागात राहणाऱ्या जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये चौथीत शिक्षण घेत असलेल्या मयुरेशने आजवर विविध शैलीत अनेक चित्रे साकारली आहे. चारकोल या कठीण माध्यमात व्यक्तिचित्रे काढण्यास त्याला अतिशय आवडते त्याचबरोबर त्याची कलर पेन्सिल मधील नामांकित व्यक्तींचे चित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम मधून या बाल चित्रकाराला खूपच शाबासकी मिळत असून त्याचं रेखाचातुर्य सर्वांच्या मनात भरण्यासारखं आहे. मयुरेशच्या अंगी रंगयोजनेचं अपूर्व कसब असल्याचा सर्वांना प्रत्यय येतो आहे त्यामुळे चित्रकलाक्षेत्रतील सर्वच दिग्गज त्याला मदत करण्यास पुढे सरसावत आहे आणि भविष्यात त्याच्या चित्रशैलीतून एक युग निर्माण होणार असा अभिप्रायही देत आहेत.
