नाशिक मिरर : दिंडोरी प्रतिनिधी

साऱ्या जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा अनंत संकटाचा सामना करून जगत आहे. शेतकरी जगला तर जग जगेल असे आपण छातीठोपणे सांगत असतो. पण तोच शेतकरी आज अस्मानीसह अनंत संकटांमुळे मरणाच्या दारात उभा आहे. एकीकडे अवकाळी पाऊस पडतो आणि माझा शेतकरी बाप दुसरीकडे ओक्साबोक्सी रडत सरकारी मदत कधी येणार याची चातकासारखी वाट पाहत कासावीस होत असतो. पण ती मदत आजपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.

 

यातच भर म्हणून दिंडोरी येथील शेतकऱ्यांने लाइट बिलाचे पैसे भरूनदेखील वीज वितरण कंपनीकडून वीज प्रवाह सुरू केला जात नसल्याने, संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील पिक धोक्यात आले होते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याकडून, वीज प्रवाह लवकर सुरू करावा म्हणून, वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अभिनय बोरकर याच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र हा अभियंता शेतकऱ्याचे फोनही घेत नव्हता.जेव्हा त्या मुजोर अभियंत्याने फोन उचलला तेव्हा त्याने संबंधित शेतकऱ्याला धमकी देताना ‘तुला तलवारीने उभा कापून टाकेल, तु ये इकडे, तुला बघतो’ अशा भाषेत दम भरला. तसेच अत्यंत अश्लिल भाषेत शिविगाळ केली. संबंधित शेतकरी सातत्याने त्या अभियंत्याकडे विनवनी करीत होता. ‘साहेब पैसे भरले आहेत, लाइट जोडा, आमच्या शेतातील पिक करपून जाईल.’ मात्र हा मुजोर अभियंता त्या शेतकऱ्याला आई-बहिणीवरून शिविगाळ करीत होता. तसेच तुला कापून टाकेल अशा भाषेत धमकावत होता. अशाप्रकारे मुजोर अधिकारी शेतकऱ्यांना धमकावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या प्रकरणातील संबंधित शेतकऱ्याच्या जीवालाही त्या अभियंत्याकडून धोका आहे. हा संबंधित अधिकारी अत्यंत खुनशी स्वरूपाचा असल्याकारणाने त्या शेतकऱ्याने जीवाचे काही बरे वाइट केले किंवा झाले तर त्यास संबंधित अभियंताच जबाबदार असणार आहे. त्यामुळे काही विपरीत परिणाम घडण्याच्या अगोदर अशा मुजोर आणि गुंडप्रवृत्तीच्या अभियंत्यास तातडीने निलंबित करावे व त्याच्यावर ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर त्याच्या संपत्तीची चौकशी करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी छावा क्रांतिवीर सेनेची व सुकाणू समितीची आग्रही मागणी आहे.

 

तरी सदर प्रकरणाची नोंद घेऊन तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा महावितरण प्रशासना विरोधात मोठे जन आंदोलन केले जाईल व त्या मुजोर अधिकाऱ्यास संघटनेच्यावतीने धडा शिकवला जाईल होणाऱ्या परिणामास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. यावेळी निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष संतोष माळोदे, शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे, भारत पिंगळे, राजेंद्र फडोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

बातम्या

Don`t copy text!