अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक मिरर :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोफत मध्यान्ह भोजन योजना शुभारंभ गुरुवार (दि. २३) करण्यात आला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सदर योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेंतर्गत कोविड काळात कामगारांना दोन्ही वेळचे जेवण देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम व्यवसायिकडून १ टक्के उपकर जमा होतो.यातून शासनाकडे ११ हजार कोटी जमा आहेत.यातून सदर योजना राबविण्यात येत आहे.सदर योजना १७ जिल्ह्यामध्ये सुरू असून आज पासून नाशिक जिल्ह्यात सुरू होत आहे.जेवणातून १२० कॅलरी मिळणार असून डाळ,भात, दोन चपात्या ,भाजी असा सकस आहार मोफत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिला जाणार आहे.ही योजना राबविण्यासाठी स्वयंचलित यंत्राचा वापर करून स्वयंपाक तयार केला जाणार आहे. एकदा तयार झालेले अन्न सुमारे सहा तास गरम राहील. २५ पेक्षा जास्त मजूर काम करीत असलेल्या ठिकाणांवर जाऊन त्यांना माध्यान्ह भोजन दिले जाणार आहे. बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्वच कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात नोंदित व अनोंदित असा भेदभाव राहणार नसून, सुमारे २५ ते ३० हजार कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले.
तर नाशिक विभागाचे कामगार उपआयुक्त विकास माळी यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले की,मध्यान्ह भोजन योजना नोंदणीकृत बांधकाम कामगार साठी मोफत असून, १८ ते ५९ वयाचे कामगार योजनेचा लाभ घेणार आहेत. सदर कामगारांनी बांधकामच्या ठिकाणी ९० दिवसांचे काम करीत असल्याचे प्रमाणपत्र देऊन ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे.नोंदणीकृत कामगारांना विविध योजनांचे लाभ घेता येतात.लग्नासाठी ३० हजार रुपये, लग्नानंतर महिलेस प्रसूती साठी २० हजार रुपये, बांधकाम कामगारांच्या पाल्याना १ ते १० वी पर्यंत च्या शिक्षणा साठी २ ते १० हजार रुपये दर वर्षी देण्यात येतात.बांधकाम कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये, गँभीर दुखापत झाल्यास २ लाख रुपये दिले जातात. बांधकाम कामगार सुरक्षा किट दिले जाते अशा प्रकारे यावेळी विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब श्रीसागर,कामगार उपआयुक्त विकास माळी, सहायक कामगार आयुक्त शर्वरी पोटे व एस. टी. शिर्के, मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक शशिकांत जाधव, नितीन निगळ, जीवन रायते, निलेश भंदुरे, समाधान तीवडे आदीसह इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
