नाशिक मिरर : प्रतिनिधी

संस्कृत भाषाभ्यास केल्यास संस्कार व संस्कृती वेगळे शिकवण्याचे आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन संस्कृत भारतीच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत मंत्री गजानन आंभोरे यांनी केले.
लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळातर्फे कै. मनोहर उपाख्य आप्पासाहेब भगवंतराव कुलकर्णी जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात झाला. आठवले-जोशी बाल विकास मंदिर, मेरी या शाळेत हा कार्यक्रम झाला. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून आंभोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयंत कुलकर्णी होते. उपाध्यक्ष उदय शेवतेकर, सहकार्यवाह सुधीर पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी व शशांक ईखणकर, संस्थेचे विश्वस्त राजेंद्र सराफ, स्पर्धाप्रमुख श्रीराम महाजन उपस्थित होते.

भाषा अभ्यासाने उच्चार शुद्ध

आंभोरे म्हणाले की, संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून, संस्कृत भाषा अभ्यासाने उच्चार शुद्ध व स्पष्ट होतात. तसेच स्मरणशक्ती वाढून सखोल अभ्यास करण्याची वृत्ती विकसित होते.  वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी संस्कृती जोपासणे, उत्तम ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. आत्मविश्वास निर्माण करून वक्तृत्वकला बहरू द्यावी. तसेचशवक्तृत्वाला कर्तुत्वाची जोड मिळावी, यासाठी प्रयत्नशील असावे.

583 स्पर्धक सहभागी

संयोजिका भारती ठाकरे यांनी स्पर्धेविषयी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील शहरी विभागातील एकूण 133 शाळा तर ग्रामीण विभागातील एकूण 186 शाळा यात सहभागी झाल्या होत्या. एकूण 583 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धाप्रमुख महाजन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. परीक्षकांच्यावतीने मोहिनी भगरे, गिरीश गर्गे, शैलेन्द्र भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.

विजेत्यांकडून वक्तृत्वकला सादर

स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यशस्वी झालेले परूल जाधव (जि. प. प्राथमिक शाळा, कळवण), मनस्वी बागूल (आर. के. एम. विद्यालय, कळवण), संस्कृती जाधव (वैनतेय विद्यालय, निफाड) यांनी आपले वक्तृत्वकला सादर केली. यशस्वी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचा गौरवशाली इतिहास

सहकार्यवाह पाटील यांनी कर्मवीर आप्पासाहेब कुलकर्णी यांच्या निरपेक्ष योगदानाचा उल्लेख करून, संस्थेचा गौरवशाली इतिहास विशद केला. शेवतेकर यांनीही मार्गदर्शन केले. गीता कौटकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक दीपक गोविंद यांनी आभार भानले. हा सोहळा फेसबूकवर लाईव्ह दाखविण्यात आला.

बातम्या

Don`t copy text!