अंधेरीची पोट निवडणूक होताच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे.
राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर 2022ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही 18 नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
