नाशिक मिरर वृत्तसेवा : औद्योगिक वसाहतीतील शारदा मोटर्स या कंपनीमध्ये रविवारी (दि.१५) दुपारी घडलेल्या भीषण अपघातात २७ वर्षीय तरुण कामगार विजय दुर्ग सिंह (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा मृत्यू झाला. कामगार सुरक्षेची साधी काळजी न घेणाऱ्या कंपनीच्या हलगर्जीपणाला हा बळी ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया कामगार वर्गातून उमटत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विजय रविवारी सकाळच्या पाळीत कामावर रुजू झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास उंचावर काम करत असताना अचानक तोल जाऊन ते पत्र्यावरून कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली.

 

दरम्यान, “कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा आणि मृताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्या,” अशी मागणी विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे. या घटनेनंतर सातपूर एमआयडीसीतील कामगार सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “अखेर किती कामगारांना प्राण गमवावे लागतील, तेव्हा प्रशासन व कंपन्या जागे होतील?” असा संतप्त सवाल कामगारांतून उपस्थित केला जात आहे.

 

Don`t copy text!