भाद्रपद शुद्ध पौर्णिमा झाल्यानंतर प्रारंभ होतो महालय मासातील कृष्ण प्रतिपदा तिथीला. यावर्षी 21 सप्टेंबर 2021 रोजी महालयारंभ आहे. 21 सप्टेंबर 2021 ला पहाटे ५.२५ पासून भाद्रपद कृष्ण प्रतिपदा तिथी आरंभ होईल. हाच पितृपक्ष म्हणून आपण पाळत असतो.
महत्त्व :
आपल्याला एखाद्या विषयी राग आला तरी आपण रागाने बोट मोडतो, त्याच वाईट होऊदे, असे मनोमनी घोळवतो. कधीकधी असे होते की, आपल्या मनात नसतानाही मनात राग भगभगत राहतो आणि तो समोरच्याला शाप स्वरूपात लागतो. तशीच पितरांची अवस्था होते. आता तुम्ही म्हणाल आपलेच पितृ आपल्याला का शाप / तळतळाट देतील. तसे नसून काही कारणे त्यांचे श्राद्धकर्म व्यवस्थित होत नाही किंवा ते केले गेलेले नसते, त्यावेळेस तो जीव त्याला गती मिळण्यासाठी तडफडत राहतो. ह्या ना त्या कारणाने त्यांचे ते तडफडणे शाप / तळतळाट स्वरूपात आपल्या पर्यंत आपल्या कुंडलीत दोष म्हणून येतात. अर्थात कुठल्याच कर्माला क्षमा नसते. आपला जन्म जरी त्या वेळेस झालेला नसेल तरी आपल्यापर्यंत येऊन ते दोष सुचवू पाहत असतात ,की आमचे अमुक एक कार्य अपूर्ण आहे, ते पूर्ण करा. आपल्या पूर्वजांना / पितरांना गती मिळवून देणं हे आपले कर्तव्य तर आहेच परंतु पुण्याचे कर्म आहे. ते केल्याने त्याचे आशीर्वाद पाठीशी येतात.
कोणी करावे :
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत रवी – राहू – शनी – केतू – गुरु ह्या सर्वांनी मिळवून काही घराण्यातील / वंशातील दोषांची उत्पत्ती केली असेल त्यांनी करावे.
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी + राहू युती अथवा कमी अंशी अंतरावर स्थिती नवम – धन – अष्टम – व्यय – प्रथम या भावात असल्यास.
रवी व्यय स्थानात असल्यास किंवा त्यावर शनी / राहू ची दृष्टी असल्यास.
ज्या व्यक्तींना कुठल्याच क्षेत्रात यश नाही. ज्यांना प्रत्येक पायरीवर अपयश मिळते.
ज्या व्यक्तींना काही भास जाणवतात, अमावस्या पौर्णिकेला त्रास होतात.
घरात लागोपाठ आजारपण, सुखाला उतरती कळा, कुठल्याच पिढीतील व्यक्तींना फारसे सुखाचे दिवस नसतील तर.
वरील कुंडली स्थिती किंवा अनुभव येत असल्यास कुंडली विश्लेषण करून घेऊन उपाय करावा.
पितृपक्ष हाच सर्वोत्तम उपाय :
ज्यांना वरील त्रास अथवा अनुभव येत असल्यास हा पितृपक्ष सर्वोच्च उपाय आहे. हा पक्ष म्हणजे असा उपाय आहे जेव्हा आपण थेट आपल्या पितरांशी संबंधात असतो. इतर वेळेस शंभर उपाय करणे आणि पितृपक्षात विधिवत उपाय करणे ह्यात कितीतरी पटींनी फरक आहे. या पक्षात आपले पितर, पृथ्वीलोकात वावर करीत असतात. आपल्या आजूबाजूला असतात. त्यांची कृपा आपल्यावर करून घ्यायची असल्यास, त्यांना संतुष्ट करणे गरजेचे असते. त्यांची आठवण काढली तर त्यांचा मनाला समाधान मिळते व ते आपल्याला आशीर्वाद देतात.
लेखक – ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे,
नाशिक (मो. 9890046273)
