॥ श्री योगेश्वरोविजयतेतराम्॥
विश्वाच्या वाग्ङ्मयात श्रीमद्भगवद्गतेचे तत्त्वज्ञान इतके अलौकिक आहे, की “अधःपतनाच्या कितीही खोल गर्तेत पडलेला माणूस सुखी आणि समृद्ध जीवनरूपी वैभवाच्या शिखरावर आरूढ होऊ शकतो.” अशी गर्जना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशोदेशांच्या ज्ञानेश्वरांसमोर करणारे पांडुरंगशास्त्री आठवले हे एक अलौकिक तत्त्वज्ञ आहेत. 19 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने…
तत्त्वज्ञानाचे सामर्थ्य
पांडुरंग शास्त्री यांना आज सारे विश्वात Applied Philosopher म्हणतात. कारण त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सर्वदूर धर्म, भाषा, वर्ण, देश यांच्या सीमा ओलांडून माणसा-माणसांपर्यंत नेले. पूजनीय दादा म्हणत असत की, गीतेच्या तत्त्वज्ञानात इतके सामर्थ्य आहे की, “माणूस अर्धी भाकरी पाण्यात बुडवून खाईल तरीही त्याचे गाल टॅमाटोसारखे लाल होतील.” म्हणजेच जीवनात आलेल्या कितीही प्रतिकुल परिस्थितीत आनंदाने माणूस जीवन जगेल आणि त्या प्रतिकूल परिस्थितीच्या छातीवर पाय देऊन आपल्या ध्येयाकडे चालू लागेल.
भगवद्गीता ही संसारी माणसासाठी
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी विश्वांच्या गाभार्यात श्रीमद्भगवद्गीतेच्या असमान्य तत्वज्ञानाचे ॐकार ज्यांनी घुमविले ते योगेश्वरकृष्ण महायोगी होते, क्रांतिकारक तत्त्वज्ञ होते. हे आजही मानव-जात विसरुन गेली आहे. हीच आजची शोकांतिका आहे.
पूजनीय दादा म्हणतात की, “भगवद्गीता ही संन्याश्यासाठी नसून तर ती संसारी माणसासाठी आहे,” कारण संसार माणसांना सतत काम, क्रोध, मोह, मत्सर या षड्रिपूंशी जीवनात रात्र-दिवस लढावे लागते. संन्यासी तर गुहेत जाऊन बसला आहे, आणि साधनेची त्याची लढाई वेगळी आहे.
भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान हे सर्वोत्कृष्ठ इंधन
तुकाराम महाराज यांनी 350 वर्षांपूर्वी लिहले आहे, “रात्रांदिस आम्हा युद्धाचा प्रसंग” याचा अर्थ सांसारिक माणसाला सतत परिस्थितीबरोबर, प्रलोभनाबरोबर, मोहाबरोबर, स्वार्थाबरोबर लढावे लागते आहे. या लढाईत भगवद्गीतेचे अलौकिक तत्त्वज्ञान हे त्याचे सर्वोत्कृष्ठ इंधन आहे.
लेखक – योगतज्ज्ञ राज सिन्नरकर, नाशिक
मो. नं. 9404784021
गीता फक्त पारायण नको
आज स्वाध्याय कार्य हे भारताच्या हजारो खेड्यांमध्ये घरा-घरात आणि झोपडीत पोहचलेले आहे. पूजनीय दाद मनुष्याला सांगतात की, गीतेच्या तत्त्वज्ञानाचे फक्त पाठांतर करू नकोस, तर गीता फक्त पारायण नको, तर गीतेचे अलौकिक तत्त्वज्ञान जीवनात आणले पाहिजे. दादांनी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सोपं करून लाखो माणसांच्या जीवनात उतरवलं आणि त्यांना भगवान कृष्णांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार जीवन जगायला शिकवलं.
तत्त्वज्ञानानुसार जगणारे कुटुंब प्रथम भारतात हवे
पूजनीय दादा 1954 साली जपानमध्ये “World Religious Conference” साठी गेले होते. त्यावेळी जगातून आलेल्या सर्व तत्त्वज्ञान्यासमोर त्यांनी गीतेचे असामान्य तत्वज्ञान सांगितले आणि ते मनुष्यांना जीवनातील सुख-दुःखावर मात करुन जीवनात स्वतःला कसे समर्थपणे उभे करु शकते याचे प्रतिपादन केले. तेव्हा पूजनीय दादांना विश्वातील अनेक देशातून “आमच्याकडे या” अशा ऑफर्स आल्यात. परंतू दादांनी त्यांना नम्रपणे नकार कळविला आणि सांगितले की, मला गीतेच्या तत्त्वज्ञानुसार जगणारा माणूस गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार जगणारे कुटुंब आणि गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार जगणारी गावे प्रथम भारतात उभी करावयाची आहेत आणि नंतरच मी हे अलौकिक तत्त्वज्ञान घेऊन विश्वात जाईल.
विश्वातल्या सर्वांना एका धाग्यात कसे ओवायचे ?
सुरुवातीला पूजनीय दादांच्या पुढे एक गहन प्रश्न होता की, विश्वातल्या सर्व मनुष्यांना एका धाग्यात कसे ओवायचे, एका प्लॅटफॉर्मवर कसे आणायचे, कारण त्यांच्यात काहीच सारखे नाही. त्यांचा धर्म, भाषा, देश, वर्ण, जीवन-पद्धती, पूजा-पद्धती, आचार-विचार हे सगळेच वेगळे आहे. एवढेच काय त्यांच्या खिशातले वित्तही सारखे नाही. टूंड्रा प्रदेशातल्या एस्किमो आणि माझ्या मुंबईतल्या मनुष्य यांच्यात काहीच सारखे नाही, त्यावेळी दादा म्हणाले, “मला गीतेतील एक अलौकिक श्लोक दिसू लागला.” “सर्वस्य चाहमं हृ दिसन्नी विष्टो”
भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की, मी सर्वांच्या हृदयात वास करतो. मग तो टूंड्रा प्रदेशातला एस्किमो असो की भारतातील एखाद्या खेड्यातला मनुष्य असो. हाच धागा पकडून पूजनीय दादांनी श्रीमद्भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान विश्वात सर्वदूर माणसा-माणसांपर्यंत नेले आणि त्यांना गीता जगायला शिकविली.
स्वाध्याय कार्य उभे केले ते याच श्लोकाच्या आधारे
सुरुवातीला स्वाध्याय कार्याची उभारणी भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानावर करतांना पांडुरंग शास्त्रींना खूप-खूप अडचणी आल्यात परंतू त्याही वेळी ते म्हणाले की, भगवद्गीतेचा एक श्लोक माझ्या डोळ्यांसमोर नाचतो आहे.
अनन्याश्चितयतो माम् येजनः पर्युपासते
तेषाम् नित्याभि मुक्तानाम् योगक्षेमं वहाम्यहम्॥
दादांनी अत्यंत प्रखर अथाचक व्रताचे पालन करुन आज संपूर्ण विश्वात भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानावर समर्थपणे उभे असलेले दिव्य स्वाध्याय कार्य उभे केले ते याच श्लोकाच्या आधारे.
आज 19 ऑक्टोबर त्यांच्या जन्मदिवशी श्रीमद्भगवद्गीता सांगणार्या भगवान कृष्णाच्याही अंगावर रोमांच उभे राहत असतील असे विनम्रपणे वाटते. पूजनीय दादांना कोटी कोटी वंदन.
—
