नाशिक मिरर वेबटीम :
गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर भाजी मार्केटचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला असून, गुरुवारी (दि. ६) सकाळी साडेदहादरम्यान मोठ्या प्रमाणात वाद झालेले दिसून आले. यादरम्यान एक भाजीविक्रेती महिला बेशुद्ध झाल्याने विक्रेते संतप्त झाले. मनपाच्या अतिक्रमण पथकासोबत पोलिसांचा फौजफाटा असल्याने तणाव निवळला. दरम्यान, सदर महिलेला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.आकाशवाणी टॉवर भाजी मार्केटमध्ये चिट्ठी पद्धतीच्या सोडतीवरून वाद सुरु आहे. मनपा आयुक्तांनी नवीन चिट्ठी पद्धत घेण्याचे आदेश दिले आहे. तसेच, याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने मनपाने न्यायालयाचे आदेश येईपर्यंत भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, तशा स्वरुपाची नोटीस लावण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संकटात व्यवसाय बंद करून कसे चालेल, असे म्हणून काही भाजीविक्रेत्यांनी याठिकाणी दुकाने थाटल्याने मनपा अतिक्रमण पथक व विक्रेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला. घटनास्थळी सशस्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
