नाशिक मिरर विशेष :
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नामोsस्तुते।।
अनादी काळापासून स्त्री ला पूजनिय मानले जाते. भारतीय संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. स्त्री ची सात्विक, सोज्वळ, शोषिक वृत्ती सगळ्यांनाच ठाऊक आहे. कर्तृत्ववान स्त्रियांनी आपला इतिहास गाजवलाय. आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे. वर्तमानातही प्रत्येक क्षेत्रात ति तिचं प्रभूत्व सिद्ध करतेय.
“झालं गेलं विसरून पूढे जाणे” हा तिचा उपजत गुण. तिच्या या वृत्तीला बहुतेक गृहीत धरले जातंय आणि हेच गृहीत धरणं तिला खटकतय.
एकाच वेळी विविध भूमिका ती समरस पणे निभावते आहे. तिच्या ठायी असलेल्या प्रेम, माया, वात्सल्याने प्रत्येक नातं फुलवत जाते. घराला हसते खेळते प्रसन्न ठेवते. आजची स्त्री शिक्षित आहे, कमावती आहे. घरकामात तिचा मोलाचा वाटा आहे. बाहेरची नोकरी सांभाळून संसार यशस्वी पणे सांभाळत आहे. मुलांना संस्कार देतेय. हळव्या मनाची असली तरी प्रसंगी खंबीर होते. आणि घरावर आलेल्या संकटाचा विनाश करते.
मग स्त्री संतुष्ट आहे काय?
कामाचा व्याप ती लीलया पेलते. जेव्हा ती दुखावली जाते, तिचा स्वाभिमान ठेचला जातो, तिच्या सहनशक्तीचा अंत बघितला जातो. तेव्हा मग ती पेटून उठते आणि बंड करते. त्यावेळी मात्र केवळ तिचा संताप दिसतो. त्यामागील पार्श्वभूमी जाणून घेण्याची तसदी कुणीही घेत नाही. खुद्द एक स्त्री देखील दुसऱ्या स्त्री चे मन जाणून घेऊ शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. सगळं काही तुझेच तर आहे असे म्हणणारे आणि आर्थिक बाबींसाठी, महत्वाच्या निर्णयांसाठी (जे तिच्याच संदर्भात असतात) तिला स्वतःवर अवलंबून ठेवणारे पती घरोघरी नसले तरी बऱ्याच घरी दिसतात. आजही नौकरी करणारी, अर्थार्जन करणारी स्त्री स्वतःचे आर्थिक नियोजन स्वतः करीत नाही. त्यासाठी तिला नवऱ्याची परवानगी लागते. स्वखुशीने सल्लामसलत करणे वेगळे पण परवानगी कशासाठी? हा अनुत्तरित प्रश्न आहे.
स्त्री पुरुष एकमेकांना पूरक आहेत. एकमेकांशीवाय अपूर्ण आहेत. हे वास्तव जो स्वीकारतो तो सहृदयतेने वागतो. जो झुगारतो त्याच्या हातून होतो अवमान ‘स्त्रीत्वाचा’.
स्त्री ला देवा सारखे पुजले जावे ही अपेक्षा नाही पण तिचे अस्तित्व पुसले जाणार नाही याची शाश्वती आज हवीय.
म्हणून सांगावेसे वाटतेय,
नारी शक्ती नारी मुक्ती
विषय चघळणे खूप झाले
कृतीत आणा काही तरी
नुसतेच नारे आता बास झाले
नवरात्रीला निष्ठेने करता
जागर आदिशक्तीच्या
ओसरल्यावर उत्सव मग का
घरात अवमान स्त्रीत्वाचा
लेकरे आपण आदिमायेचे
समान हक्क स्त्री पुरुषांचे
सोबत नांदू आनंदाने
गात गात जीवन गाणे

