नाशिक मिरर विशेष :

आजवर तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या असतील. त्यावर विचार केला असेल. त्यातून बोध घेतला असेल, मन रमवले असेल. आनंद देखील मिळवला असेल. अशीच ही एक गोष्ट. यातून कांही बोध घ्यावासा वाटला तुम्हाला तर मलाही बरं वाटेल. कारण ही…माझीच गोष्ट आहे..! कालानुरुप झालेल्या माझ्यातल्याच बदलांची..!!

शेणामातीने सारवलेले, कवलारू छप्पराचे, कोनाडे, खुंट्या असलेले, तांब्या, पितळी भांडयांनी लखलखणारे सात्विक, सोशिक रूप होते माझे. मातीचा थोडा उंचवटा करून त्यावर सारवलेल्या चुली. धूर बाहेर जायला छोटासा झरोका. अगदी साधा. शुचिर्भूत होऊन पाटावर बसून सासुरवाशिणी चुलीला हळदी कुंकू वहायच्या. मग चुलीत विस्तव पेटवून रुचकर स्वयंपाक रांधायच्या. देवाचा नैवेद्य काढताना आठवणीने चुलीचाही बाजूला काढून ठेवायच्या. दुसऱ्याची भूक भागवायला स्वतः चटके सोसणारी ती ‘ चूल ‘ म्हणजे माझा प्राणच ! त्या चुलीजवळ हमखास असणाऱ्या वस्तू म्हणजे फुंकणी, सांडशी, थोड्या बाजूला पोळपाट लाटणे, तवा आणि परात. कोपऱ्यात दुरडी. दुधाचे पातेलेही आसपासच. इतर भांडी फडताळात. एखाद्या कोपऱ्यात लोण्याचे पातेले ठेवण्यासाठी टांगलेले शिंकाळे. स्वच्छ घासलेले हंडा, घागर, कळशी सदैव पाण्याने भरलेले. धान्यांनी भरलेल्या पिंपांवर पायली, अदली, शेराची मापं विराजमान असायची. सुपाचे वास्तव्य देखील तेथेच जवळपास. जुन्या झालेल्या माठात कैरीचे लोणचे मुरत असायचे.

           झडझडून केर काढून शेणाने सारवून भल्या पहाटे मला स्वच्छ केले जायचे. चुली पुढे रांगोळी रेखली जायची. मंजुळ आवाजातील ओव्या आणि घररर….घरर….जात्याच्या लयबद्ध आवाजाने खऱ्या अर्थाने माझी सकाळ प्रसन्न व्हायची. त्यानंतर पाट्या-वरवंट्यावर वाटण्याच्या, खलबत्यातल्या कुटण्याच्या, रवीने ताक घुसळण्याच्या आवाजांची आणि चुलीवरून कांहीबाही उतू जाणाऱ्या पदार्थाच्या आणि शिजणाऱ्या अन्नाच्या परिचीत वासांची सोबत मला हवीहवीशी वाटायची. साधेसुधेच पदार्थ पण खरपूस खमंग वासानेच तृप्त वाटायचे. कधीतरी येणाऱ्या तळणाच्या वासाने सणवार असल्याचे किंवा पाहुणे आल्याचे कळायचे. जेवणाच्या पंक्ती माझ्याच भिंतीलगत बसायच्या. क्वचित प्रसंगीच इतरत्र. छान ताटा-पाटावर जेवण असायचे. पुढे पाण्याचा तांब्या न् फुलपात्र. पानात वाफाळलेले सुग्रास ताजे अन्न. ताटाभोवती पाणी फिरवून नेवैद्य दाखवून, नमस्कार करून मग जेवण सुरू व्हायचे. तृप्तीचा ढेकर देऊनच सर्वजण समाधानाने उठायचे.
त्या काळी सर्वच भांडी आकाराने मोठी आणि वजनाने जड असायची. डोळ्यांना सहज दिसतील अशा पद्धतीने ती ठेवली जायची. पारदर्शक बरण्या नसल्या तरी कशात काय ठेवले आहे हे गृहलक्ष्मी मात्र बरोब्बर ओळखायची.

माणसाच्या रहाणीमानात जसजसे बदल होत गेले तसे माझ्या या वर्षानुवर्षांच्या ठेवणीत झालेले बदलही मी स्विकारले. गरजेनुसार, सोयीनुसार होत गेलेले हे बदल. चुलीचे रूपांतर दगडी कोळशाच्या शेगडीत झाले. पितळीच्या भांड्याची जागा हळू हळू ऍल्युमिनियमने घेतली. घरातील सदस्य-संख्या जशी रोडावू लागली तशी स्वयंपाक घराची जागाही कमी होत गेली. ऐसपैस असणारा माझा परिसर आकसत गेला. कालांतराने माझं ‘ किचन ‘ असं सुटसुटीत नामांतरणही झाले. मी पाहिलेली ही पुढची पिढी. या पिढीने खूप बदल बघितले, स्वीकारले आणि मलाही बदलवले. माणसाला आर्थिक स्थैर्य येत गेलं, तो नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात राहू लागला. नवीन गोष्टीचे त्याला अप्रूप वाटू लागले. आपल्याही घरात ही अपूर्वाई हवी असे त्याला मनोमन वाटू लागले आणि त्याप्रमाणे तो ते मिळवू लागला. चूल नामशेष झाली. स्टोव्ह, बीडाची शेगडी, स्टीलची शेगडी आणि काचेची शेगडी इतका चुलीनंतरच्या प्रवासाचा मीच साक्षीदार. स्टीलची भांडी. गॅसचा कट्टा/ ओटा. मिक्सर, डबे रचायला कडप्पे. ताटं, पेले ठेवायला भांड्यांचे स्टँड, छोटसं बेसिन असे माझे.. मी कात टाकल्यानंतरचे.. किचनरुप. माणसाची दिनचर्या वाफाळत्या चहाने सुरु होऊ लागली आणि माझी कपबशीच्या आवाजाने. पूर्वीचे बरेचसे खाद्यपदार्थ विस्मृतीत जमा होऊ लागले. न्याहारीचे नवनवीन पदार्थ जन्मास येऊ लागले. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी खास भांडी राखून ठेवण्यात येऊ लागली. क्रोकरीचा जन्म झाला. दिवसेंदिवस ही पुढची पिढी स्टायलिश होऊ लागली. मॉड्युलर किचन हे माझं आजचं रूप! टापटीप आणि डोळे दीपतील असं चकचकीत! सगळं झाकलेलं , दाराच्या आड! पण खरं सांगू? इथे माझी घुसमट होतेय. पूर्वी कसा माझा नि सगळ्या भांड्याकुंड्याचा मनमोकळा संवाद व्हायचा. आता सगळे बिचारे आपापल्या खोल्यांत (ट्रॉलीत) चिडीचूप. भरलेल्या माठाची जागा आता वॉटर प्युरीफायरने घेतली. एवढ्याशा जागेत किचन कट्टा आणि सर्विस कट्टा एकत्र नांदू लागले. सर्विस कट्टयावर फूड प्रोसेसर, ओव्हन थाटात बसले. त्याआधीच या मॉडर्न किचनमधे फ्रीजची वर्णी लागलेली. कित्येकांचे पूर्वीच्या वेगळ्या देवघरातले देवही माझ्याच आडोशाला येऊन बसले.

अद्यावत सुखसोयींनी सुसज्ज अशा या माझ्या किचन नामक अवकाशात माणसाचा वावर मात्र कमी कमी होत चाललाय. त्याला वेळच नाहीय. कसा तरी सकाळी स्वयंपाक उरकायचा. मुले शाळेत, नवरा बायको कामावर आणि घर बंद! मला उदास वाटते इथे खूप. पण करणार काय? जेवायला देखील ही मंडळी टीव्ही समोर जाऊन बसतात. हे एकटेपण खायला उठतं मला. मला…मला तर माझी तशीच त्यांचीही काळजी वाटू लागलीय. घुसमट वाढत चालली म्हणून हे असं सांगावसं वाटलं तुम्हाला. आहे हे असे आहे. उद्याचे चित्र कसे असेल? मॉड्युलर किचनची पुढची पिढी कशी असेल? कदाचित अधिक तांत्रिक आणि माझी माणसं रेडी टू इट पचवणारे. एका क्लिकवर जेवणाच्या ऑर्डर देणारे. पण या अशा रेडिमेड जेवणाने त्यांचे पोट भरेल हो फक्त, पण तृप्ततेचा ढेकर हरवलेलाच असेल ना? तो जपायला हवा. तुमची ती तृप्तता हीच श्वास आहे हो माझा. तुमचं मनच भरलं नसेल तर तृप्तता येणार कशी? मनाला तर फक्त अन्न नाही, आपुलकीही लागते हे समजून घ्याल तुम्ही..?

मुलांनो, एक ऐकाल माझं? तुम्ही लाख प्रगती करा पण माझ्याकडे पाठ फिरवू नका. इथे शिजवलेले ताजे अन्न तुम्हाला नेहमीच समाधान देईल. तुमच्या सोयीने स्वैपाक करा. तुमच्या पध्दतीने करा. कुणीही करा. माझा कसलाच हट्ट नाहीय.
केवळ स्त्रीच नव्हे तर प्रत्येकालाच किमान स्वयंपाक येणं ही आजची खरी गरज आहे. साधंच असलं तरी तुम्ही माझ्या साक्षीने समाधानाने रांधलेलं ते अन्नच खरं पूर्णब्रह्म असेल. त्यासाठी मात्र तुमचा या माझ्या अवकाशात सुखद वावर असला पाहिजे. तरच माझीच नव्हे तुम्हा सर्वांचीच घुसमट कमी होईल हे लक्षात राहू द्या. राहील ना?

Don`t copy text!