नाशिक मिरर विशेष :

सकाळी उठल्याबरोबर हाताला स्पर्श हवा असतो, तो मोबाईलचा. त्याचं मुखदर्शन झाल्याशिवाय आपण ब्रश सुद्धा करत नाही एवढं त्या मोबाईलचं गारुड आपल्या मनावर आहे. करणार तरी काय? आधीच घरात माणसं कमी आणि जी आहे त्यांच्याकडे वेळ कमी. त्यामुळे मनात असलेल्या असंख्य भावना मोबाईल पुढे व्यक्त करण्यासाठीच जणू या मोबाईलचा जन्म झालाय अस वाटतं. शिवाय या मोबाईल मध्ये किती किती आणि काय काय दडलंय हे आपले आपल्यालाच ठाऊक.

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप्प, युट्युब, आणि अडले नडले तर गुगल बाबा आहेच मदतीला. कोणताही प्रश्न विचारा नेट कनेक्टिव्हिटी उत्तम असेल तर उत्तर आलेच म्हणून समजा. हो, पण सर्वकाही आपण विचारू तेच. स्वतःहून हे असले गॅजेट काही आपल्याशी बोलत नाहीत. नाही म्हणायला टेकनोलॉजि विकसित झालीय खरी. ते रोबोट का काय असतात म्हणे. अहो पण सर्व सर्वसामान्यांना कुठलं आलंय परवडायला? आपण म्हणजे जास्तीतजास्त जीबी कोणत्या नेट प्लॅन मध्ये फ्री आहे याच्याच शोधात.

मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्पुटर,आय फोन, आय पॅड या निर्जीव वस्तूच हल्ली आपल्या सजीवांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ज्यांना कधीही आपण पाहिले नाही, ज्यांच्याशी आपला काहीच सवांद नाही अशांना मेसेज, पोस्ट, शुभेच्छा देण्यासाठी आपली बोटे आसुसलेली असतात. आणि त्यावर मग पलीकडून काय प्रतिक्रिया येतात या साठी मन अधीर होऊन जातं. जीवाची नुसती तगमग होते. नजर केवळ लाईक्स आणि हसरे इमोजी शोधत राहते. तसे झाले नाही तर आपण अस्वस्थ होतो. अहो नवऱ्याचा वाढदिवस असला तरी पण आपण त्याचा फोटो स्टेटसला ठेवतो?. तिथेच लव्ह यू, I am lucky to have you in my life, असले काहीतरी शब्द त्या फोटोवर चिटकवतो आणि दिवसभर त्या स्टेटसची कुणी दखल घेतंय का ते बघत बसतो. आता आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसाचे आपल्याला कौतूक! इतरांना काय त्याचं? पण तेही भरभरून टाइप करत बोटांचा व्यायाम करत सुटतात. इंटरनेट चा वापर करताना लोकांना वेळेचं भान उरत नाही, तहान भुकेची जाणीव होत नाही.

असे असले तरी या सर्व सोशल मीडियाचे, गॅझेट चे फायदेही आहेत हे देखील नाकारून चालणार नाही. कोणी आपल्याला खटकले, नाही आवडले तर त्यांचा नंबर आपण ब्लॉक करू शकतो. फेसबुक किंवा व्हाट्सअप्प स्टेटस कुणी बघावे याचे सेटिंग आपल्याला करता येते. व्हिडीओ कॉल्स मुळे दूर असलेल्या जिवाभावाच्या व्यक्तीला बघता येते. कुणाशी कधीही कॉल करून बोलता येते, व्यस्त असतील तर व्हॉइस मेसेज, किंवा टेक्स्ट मेसेज करता येतो. या सर्व जमेच्याच बाजू म्हणायच्या. लॉकडाऊन च्या काळात मुलांना घरून शिकता आले, मोठ्यांना काम करता आले. व्हाट्सअप्प, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, एसेमेस, व्हिडीओ कॉल्स यामुळे आपली मानसिकता जपता आली. स्थिर राहता आले. कारण आपण स्वतःला या माध्यमात गुंतुवून ठेवू शकलो. या लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांचा जन्म झाला. प्रेम कहाण्या फुलल्या, नवीन परिचय झालेत. अनेकांना नव्या वाटा दिसल्या, नवीन कल्पना सुचल्या.
यावरून असेच लक्षात येते की तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या बळावर माणसाने माणसासाठी विकसित केले आहे. त्याचा विवेक बुद्धीने वापर केला तर संधीच सोनं होईल अन्यथा माती व्हायला वेळ लागत नाही……..
कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच!

बातम्या

Don`t copy text!