नाशिक मिरर विशेष : बाळाच्या जन्मआधीच त्याच्या आई बाबांनी मनात अनेक गोष्टी ठरवून ठेवल्या असतात. खूप स्वप्न रंजन केलेले असते. अर्थात मनुष्य स्वभावाला ते अनुसरूनच आहे. बाळ जन्माला येतं आणि त्याच्या वाढत्या वयासोबत आपल्या अपेक्षाही वाढतंच जातात. तिथे मात्र आपले चुकते. एखादी गोष्ट व्हावी असे वाटणे ठीक आहे पण त्याचा अट्टाहास करणे मात्र चुकीचेच. चारचौघात आपल्या मुलाचे वेगळेपण ठळकपणे दिसावे, त्याच्या चेहऱ्यावर हुशारी झळकवी, ते चुणचुणीत असावे, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी सूचनांचा सतत भडिमार आपण आपल्या मुलांवर करत असतो. त्यासाठी रागावून, ओरडून बोलतो. एवढे करून असे लक्षात येते की मुलं त्यांना जसे वागायचे तसेच वागतात. कारण काय? तर आपला उद्देश जरी चांगला असला तरी सांगण्याची, वागण्याची पद्धत बरोबर नसते. मग मुलांना रागावायचेच नाही का? तर तसेही नाही. परंतु त्यांच्याशी आपला उत्तम संवाद असला पाहिजे. आपण त्यांना योग्य वेळ दिला पाहिजे. मुलांना काय वाटतं हे सर्वात महत्वाचे. आपल्या आई बाबांसाठी आपण महत्वाचे आहोत ही भावना त्यांच्यात निर्माण होणे खूप खूप गरजेचे आहे. याचा अर्थ सतत त्यांना खुश ठेवणे असे ही नाही बरं का. गरजेची मागणी होण्याआधीच ती त्यांना पुरवणे योग्य नाही. “सध्या याची गरज नाही”, “आपण आत्ता ही गोष्ट घेऊ शकत नाही” असे व्यवस्थित, स्पष्ट सांगता यायला हवे. मुळात आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव मुलांना पहिले पासूनच करून द्यायला हवी म्हणजे मुलांच्या अपेक्षा फार वाढणार नाहीत.
बहुत करून आपण सगळे विभक्त कुटुंबात राहत असल्याने घरांत इन मिन तीन चार सदस्य असतात. पण मुलांना आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, मावशी काका, आत्या मामा, त्यांची मुलं या सर्वांच्या संपर्कात ठेवणे आवश्यक आहे. जेणे करून मुलांना माणसांची ओढ राहील. ते स्वकेंद्रित राहणार नाही. त्यासाठी कौटुंबिक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणे गरजेचे आणि योग्य ठरते.

मुलं ही अनुकरण प्रिय असल्याने ती सतत दुसऱ्या कडून घेत असतात. त्यामुळे आपल्या मुलांनी जसे वागावे असे आपल्याला वाटते ते ते सर्व गुण आपण अंगिकारले पाहिजे. या शिवाय मुलं बाहेरून देखील खूप काही शिकत असतात. सामाजिक संस्कार आपसूकच होत जातात. तेव्हा त्यांची संगत कोणाशी, कशी आहे यावर आपले जातीने लक्ष हवे. मुलांना मोठ्या शाळेत घातलं, नामांकित क्लास लावून दिला म्हणजे आपले कर्तव्य संपत नाही. तिथे त्यांचे वर्तणूक, प्रगती कशी आहे याचा वेळोवेळी आढावा घ्यावा लागतो. मग मीच करू का? माझी एकटीचीच/ एकट्याचीच जबाबदारी आहे का? असे सवांद मुलांच्या कानावर पडणे योग्य नाही. मुलं दोघांची असतात. त्यांच्या प्रत्येक यशात अपयशात आपली जबाबदारी असतेच.
मुलांच्या उज्वल भविष्याची मनोकामना करणे अगदी अगदी स्वाभाविक आहे. पण त्या उज्वल भविष्याचे नाजूक रोप त्यांना स्वतःला लावू द्या. त्याची त्यांना निगा घेऊ द्या. म्हणजे मग ते झाडात रूपांतरीत होईल तेव्हा त्याची गोडी काही औरच असेल. कष्टाचे चीज झाल्यानंतरचा आनंद निराळाच! त्यामुळे त्यांना जे आवडत असेल, ज्यात गती असेल ते ते त्यांना करू द्यावे. तसे शिक्षण घेण्याची मुभा त्यांना जरूर द्यावी.
हे सगळं करत असताना आई बाबा म्हणून आपली जबाबदारी त्यांच्यावर आहे, पुढे त्यांनीच आपल्याला सांभाळायचे आहे हे त्यांच्यावर आधीपासूनच बिंबवा. कारण आपणच त्यांना मोठी मोठी स्वप्नं दाखवतो. मग एकदा का ते स्वप्नांचा पाठलाग करता करता खूप पुढे निघून गेले की मग आपल्याला त्यांच्या जवळ जाता येत नाही. आणि त्यांचीही मागे येण्याची मानसिकता नसते. त्यामुळे वास्तवाची जाणीव मुलांना आणि पालकांना दोघांनाही हवी.
मुलं मोठी होताना आपणही त्यांच्या सोबत प्रगल्भ होत जावे आणि एका वळणावर आपल्यात मैत्रीचं नातं निर्माण व्हावं, जे नेहमीच निर्मळ, निखळ असतं.
