नाशिक मिरर विशेष : प्रश्न विचारणारे इवलेसे अक्षर “का” मनासारखे उत्तर मिळाल्यावर जग जिंकल्याचा आनंद देतो.
मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या “का” चे थोडक्यात वर्णन करता येईल. मनात प्रश्न, कुतूहल, आश्चर्य निर्माण करणारा “का” समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर चिडचिड, अस्वस्थता देखील निर्माण करू शकतो. मनाला हुरहूर आणि काळजाचे ठोके सुद्धा वाढवू शकतो. कुठलीही गोष्ट करताना ती का करावी? त्यामुळे काय होणार आहे? नाही केली तर चालेल का? असे प्रश्न मनात आलेच पाहिजे. या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली की मग आपण प्रयत्नांच्या वाटेवरून चालू लागतो, यशाच्या दिशेने.
आपल्या मानत हा “का” वारंवार येणं तसं चांगलंच. आपली विचार करण्याची क्षमता जागृत असल्याची ती जणू खूण आहे. एखादे काम सांगितले म्हणून करायचे यात गंमत नाही. ते समजून उमजून केले तर मजा येते आणि नव्या कल्पनांची रुजवात देखील होते.
एखादे काम जेव्हा जमत नाही, अनपेक्षित घटना घडतात, सतत अपयश येतं तेव्हा हा “का” मनात नैराश्याने डोकवत असतो. त्यावेळी ‘केवळ माझ्या सोबतच असे का’? ‘मी कोणाचं काय बिघडवले आहे’? असे विचार साहजिकच आपल्या मनात येतात. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच. शांतपणे विचार केला, स्वसंवाद झाला की आपले आपल्यालाच उमगते. मग “का”? उरत नाही कारण “कारण’ मिळालेले असते.
जन्माला आल्यापासून ते अंतापर्यंत आपण सतत धडपडत असतो. काहीतरी मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो. इथे गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, जातीपातीचा, धर्माचा कुठलाच भेद नसतो कारण प्रत्येकाची अभिलाषा वेगळी, स्वप्ने वेगळी. एवढेच काय तर मनुष्याप्रमाणे पशु पक्षी, कीटक देखील सतत प्रयत्न करताना दिसतात. त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी. कार्यमग्न मुंगी हे त्याचे उत्तम उदाहरण!
प्रयत्न म्हणजे काय? तर ‘नियोजनबद्ध कृती’
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे’ हे आपण जाणतोच, मानतोही. प्रयत्न जेव्हा जाणीवपूर्वक, अभ्यासू वृत्तीने, अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली होतात आणि ज्यात सातत्य असते तेव्हा यश मिळतेच. त्या यशाची धुंदी, गोडी काही औरच! ते समाधान वेगळेच. पण जेव्हा सतत अपयश येतं तेव्हा जरासे खचतो आपण, वाईट वाटतं. हे वाईट वाटणे जेवढे अपयश आल्यामुळे असते त्यापेक्षा जास्त आपल्यावर कुणी हसेल, काही बोलेल, उगाच चर्चा होतील यासाठी जास्त असते. आपण समाजात राहतो तेव्हा लोकांचा विचार करावा पण उगाच कोणत्याही गोष्टी साठी नाही. हसणारे हसत राहतात, बोलणारे बोलत राहतात. प्रोत्साहन देणारे फार थोडे असतात. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा. सगळ्यात महत्वाचे आपल्या मनाला आपणच उभारी द्यायची. प्रामाणिक प्रयत्न करायचेत. कायम सकारात्मक राहून. आणि लक्षात ठेवा हिंमत कधी हारायची नाही!
आयुष्याच्या प्रवासात घाट, वळणे लागणारच! खाच खळगे दिसणारच. चढ उतार येणारच. कधी कडक उन्हाचा त्रास, कधी कडाक्याची थंडी तर कधी वादळ, पाऊस मार्गात असणारच. कधी मिट्ट काळोख तर कधी धुक्याची पहाट. एखादे वळणावर अनपेक्षितपणे संकट येणार. त्याचा सामना करत असतानाच दुसरे संकट आवासून उभे. कधी वाट चुकलोय वाटणार, कधी खरच वाट चुकणार. कुणाला विचारलं तर कुणी बरोबर सांगणार, कुणी दिशाभूल करणार. मग काय? थांबवायचा प्रवास? मुळीच नाही. अरे आलोय जन्माला तर भरभरून जगायचं. आहे ते स्वीकारत जायचं, आनंद लुटत जायचा आणि पुढे जात राहायचे. डगमगायचे नाही, हिंमत कधी हारायची नाही.
एखादे वेळी आपण खूप थकणार. निराश होणार. आता या पुढे एक पाऊल देखील पडणार नाही असे वाटणार. वाटू द्या. देह थकला असेल त्याला जरा विश्रांती द्या पण मनाला थकून चालणार नाही. म्हणायचं.. ‘ तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची, पर्वा बी कुणाची’ अन करायची हिम्मत पुढचा प्रवास करण्याची.
जशी आपण प्रत्येक गोष्ट धीराने, धैर्याने करायची असते तशीच दुसऱ्यालाही हिंमत द्यायची असते. कुणाची हिंमत होत नसेल किंवा हिंमत खचत असेल तर आपण शब्दांची पुरेपूर ताकद वापरून पुढच्याची हिंमत वाढवायची असते. आपुलकीचे, जिव्हाळ्याचे दोन शब्द आणि पाठीवर मारलेली एक प्रेमळ थाप हत्ती चे बळ देऊन जाते. अनेकांनी असा अनुभव घेतला असेल. हो ना?
म्हणूनच म्हणावेसे वाटते…
संकटे येतात तशी जतातही
त्यांनाही वेळ नसतो फार काही
जातांना अनुभवाचा खाऊ देतात
जे जगण्याचे तंत्र शिकवतात
आपण नेहमीच म्हणायचे “या आता”
जरी संकट म्हटले “येतो पुन्हा”
आलेच हटकून तर करायची खातीरदारी
जाताना देणार आहेच आपल्याला काहीतरी
संकटे येतातच मुळी परीक्षा घायला
अभ्यास किती झालाय ते पाहायला
पूर्ण नाही झाला पेपर तरी हरकत नाही
कोरा पेपर मात्र ठेवायचा नाही
आयुष्याच्या पसाऱ्यात
संकटे फारच क्षुद्र आहे
आयुष्य फार सुंदर आहे
आयुष्य अनमोल आहे…….
आणि हो, “प्रयत्नांती परमेश्वर” तेव्हा लक्षात ठेवा “यश तुमचेच आहे”.
